कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना जबर मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

गणेश पिटेकर
Wednesday, 16 December 2020

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व त्यांची सहकारी ईशा झा यांना मारहाण झाल्याचे जाधव यांचे वकील झहीर खान पठाण यांनी बुधवारी (ता.१६) पुण्यात माध्यमांशी सांगितले आहे.

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व त्यांची सहकारी ईशा झा यांना मारहाण झाल्याचे जाधव यांचे वकील झहीर खान पठाण यांनी बुधवारी (ता.१६) पुण्यात माध्यमांशी सांगितले आहे. जाधव यांच्याबाबत कट रचल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांना मारहाण झाल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात खून खटल्याच्या सहआरोपी ईशा झाच्या वतीने आज बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याचे पठाण यांनी सांगितले.

 

वकील झहीर खान पठाण माध्यमांना म्हणाले, की हर्षवर्धन जाधव व त्यांची सहयोगी ईशा झा हे कारमधून सोमवारी (ता.१४) औंधकडे जात होते. दुचाकी आडवी घालून दुचाकीवरील फिर्यादी अमन चढ्ढा, करण चड्ढा आणि एका नगरसेवकाने ईशा झा व हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवले. अमन चढ्ढा, करण चढ्ढा आणि एका नगरसेवकाने ईशा आणि हर्षवर्धन जाधव यांना बेदाम मारहाण केली. यात ईशाचा विनयभंग करण्यात आला आहे.

 

 

गेल्या आठवड्यातच मी हर्षवर्धन जाधव यांच्या वतीने मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी असलेल्या त्यांच्या पत्नीविरूद्ध खटला जिंकला असल्याने यामध्ये राजकीय हेतू नाकारता येत नसल्याचे वकील पठाण यांनी सांगितले. जरी ईशा आणि हर्षवर्धन यांनी आपली तक्रार नोंदवावी अशी विनंती केली तरी पोलिसांनी तक्रार अद्याप नोंदवून घेतलेली नाही आणि उलट ३०७ चा खोट्या गुन्हा दाखल केल्याचा दावा वकील झहीर खान पठाण यांनी केला आहे. माजी आमदार जाधव यांना झालेली मारहाण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी ‘ई सकाळ’शी बोलताना केला आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complainants Assaulted Former MLA Harshwardhan Jadhav Kannad