esakal | वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारताच रावसाहेब दानवेंनी काढला पत्रकार परिषदेतून पळ
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb Danve Press In Aurangabad1

नव्या कृषी कायद्याविरूद्ध दिल्ली सीमेवरील सिंघु येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन, पाकिस्तानचा हात असल्याचे  वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते.

वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारताच रावसाहेब दानवेंनी काढला पत्रकार परिषदेतून पळ

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : नव्या कृषी कायद्याविरूद्ध दिल्ली सीमेवरील सिंघु येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन, पाकिस्तानचा हात असल्याचे  वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी आज मंगळवारी (ता.१५) पत्रकार परिषद घेतली. या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न विचारताच त्यांनी आपण हाडाचे शेतकरी आहोत. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे सांगून पत्रकार परिषदेमधून त्यांनी पळ काढला. पत्रकारांनी वारंवार विचारूनही दानवे पाऊले टाकीत निघून गेले.


औरंगाबादेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कृषी कायद्यांविषयी बोलण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली होती. दानवेंनी कृषी कायद्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या कृषी कायद्याबाबत लोकसभेत व राज्यसभेत चांगली चर्चा झाली. परंतू नंतर विरोधी पक्षाने मतदानावेळी गोंधळ घातला. विधेयकाच्या प्रती फाडून सभापतींच्या दिशेने भिरकावल्या एकप्रकारे त्यांनी लोकशाहीची पायमल्ली केली. विरोधक या कायद्यांबाबत गैरसमज पसरवीत आहेत. पण हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. कोणत्याही सरकारने लागू केल्या नसतील एवढ्या जास्त स्वामिनाथन समितीच्या शिफारसी आमच्या सरकारने लागू केल्या. शेतकऱ्याचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दीष्ट पंतप्रधानांचे आहे असेही त्‍यांनी सांगितले.


मला काय विचारायचे एकदाच विचारा!
दानवेंना पत्रकारांनी प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्वांचा एकच प्रश्‍न आहे. काय विचारायचे सर्वांनी एकदाच विचारा मग मी बोलतो असे ते म्हणाले. शेतकरी आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे ‘बेताल’ वक्त्व्य दानवेंनी केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारले तेव्हा ‘‘मी हाडाचा शेतकरी आहे, मी जनावरांचे दूध काढतो. चारा टाकतो, गाडी हाकतो, बैल धूतो हे सर्व करतो. मी बनावट शेतकरी नाही. शेतीच्या क्षेत्राचे ज्ञान आहे. मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला, असे दानवे म्हणाले व ताड्कन उठले. पत्रकारांनी विचारले की, मग नेमके तुम्हाला काय म्हणायचे होते ते स्पष्ट करा. तेव्हा ते पाऊले टाकीत निघुन गेले. त्यांच्या पलायनाने अनेकजण अचंबितही झाले.

संपादन - गणेश पिटेकर