
महापालिकेच्या निवडणुकीत 115 वॉर्डांमधून लढण्याची तयारी करा, जुने हेवेदावे सोडून कामाला लागा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले
औरंगाबाद- आगामी महापालिकेच्या निवडणुकीत 115 वॉर्डांमधून लढण्याची तयारी करा, जुने हेवेदावे सोडून कामाला लागा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले मंगळवारी (ता. 21) दिले.
महापालिकेची निवडणूक आगामी एप्रिल महिन्यात होणार आहे. यापार्श्वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची गांधी भवनात नुकतीच बैठक पार पडली होती. यावेळी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या शिवसेनेसोबत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत दोन मतप्रवाह दिसून आले. कॉंग्रेसमधील एका गटाने महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणुकांना आपण समोर गेले पाहिजे असे मत व्यक्त केले तर दुसऱ्या गटाने मात्र स्वबळावर लढण्याची मागणी केली.
हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं
पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महापालिकेच्या 115 वॉर्डांमधून लढण्याची तयारी करा असे निर्देश दिले. एका वॉर्डासाठी अकरा जणांची समिती नेमून त्या-त्या वॉर्डातील समस्या, इच्छुक उमेदवारांची नावे, त्याने जनतेची केलेली कामे आदीची माहिती आणि यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पुढील महिन्यात हा सर्व अहवाल कॉंग्रेस प्रदेश कमिटीकडे पाठवावा. त्यानंतर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की महाविकास आघाडी म्हणून यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
लवकरच औरंगाबादेत बैठक
बाळासाहेब थोरात यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आठवडाभरात औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून, यावेळी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. बैठकीला जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, ज्येष्ठ सदस्य प्रकाश मुगदिया, केशवराव औताडे, रवींद्र काळे, रवींद्र काळे, इब्राहीम पठाण, चंद्रभान पारखे, मोहसीन अहमद, सरोज मसलगे, सुरेखा पानकडे, भाऊसाहेब जगताप यांच्यासह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने