कोविड’चा अहवाल येईपर्यंत मृतदेह रुग्णालयातच ठेवायला हवा

मनोज साखरे
Friday, 24 April 2020

अंत्यसंस्काराला उपस्थित या सर्वांना क्वारंटाइन करण्याची तयारी सुरू आहे. एवढी समस्या येण्यापेक्षा घाटी रुग्णालयानेच अहवाल येईपर्यंत मृतदेह राखून ठेवायला हवा होता. रुग्णाचा आधीचा निगेटिव्ह अहवाल गृहीत धरून अंत्यविधीसमयी लोक सहभागी झाले. अशाने लागण होण्याचा धोका अधिक वाढू शकतो.

औरंगाबाद  ः इतर आजारांसह कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संशयित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या स्वॅबचे नमुने चाचणीसाठी घेणे बंधनकारक आहे. आता त्याच धर्तीवर अशा रुग्णाचा मृतदेह स्वॅबचा अंतिम अहवाल येईपर्यंत रुग्णालयाने रुग्णालयातच ठेवायला हवा. महामारीच्या काळातील ही गरज आहे.

शिवाय अंत्यविधीवेळी होणाऱ्या गर्दीवर तातडीने नियंत्रण आणण्याची आवश्‍यकताही आता निर्माण झाली आहे. शहरातील भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेला १९ एप्रिलला ताप व दम्याचा त्रास असल्याने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी महिलेचा स्वॅब नमुना घेण्यात आला; तो रात्री निगेटिव्ह आला.

तथापि, या महिलेवर कोविड संशयित म्हणून उपचार सुरू होते आणि तिचा मंगळवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. नियमानुसार त्या महिलेच्या मृत्यूनंतर स्वॅब नमुने घेण्यात आले.

या वेळेत मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला गेला. मृतदेह ताब्यात येताच नातेवाइकांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. या अंत्यसंस्काराला नियमापेक्षा अधिक लोक उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी रात्री त्या महिलेचा दुसरा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. आता अंत्यसंस्काराला उपस्थित या सर्वांना क्वारंटाइन करण्याची तयारी सुरू आहे. एवढी समस्या येण्यापेक्षा घाटी रुग्णालयानेच अहवाल येईपर्यंत मृतदेह राखून ठेवायला हवा होता. रुग्णाचा आधीचा निगेटिव्ह अहवाल गृहीत धरून अंत्यविधीसमयी लोक सहभागी झाले. अशाने लागण होण्याचा धोका अधिक वाढू शकतो.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काय करायला हवे?

 • महामारीच्या काळात अंत्यविधीत मोठ्या संख्येने येणाऱ्यांमुळे संसर्ग होण्याची शक्यता पाहून
 • या उपाययोजना महापालिका, आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाने राबवायला हव्यात.
 • एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचे नातलग महापालिकेकडे स्मशान परवाना घेण्यासाठी येतात.
 • हा परवाना देताना मृत्यूचे कारण व मृत व्यक्तीसह नातलगाची सर्व नोंद घ्यायला हवी.
 • मृताची तपशिलासह माहिती तत्काळ पोलिस विभागाला द्यायला हवी.
 • पोलिस विभागाने मृताच्या पत्त्यावरून संबंधित पोलिस ठाण्याला ही माहिती कळवावी.
 • (स्मशान परवाना विभागात पोलिस नियुक्त केला तरी तेथील पोलिस ही माहिती संबंधित ठाण्याला कळवू शकतील.)
 • पोलिस ठाणेस्तरावर अंत्यविधीपूर्वी दोन अथवा तीन पोलिस तेथे बंदोबस्तासाठी जातील.
 • अंत्यविधीसाठी ठरविलेल्या निकषानुसार पोलिस सर्व खबरदारी घेतील. सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनाही करतील.
 • अंत्ययात्रा निघण्यापासून सर्व विधी पार पडेपर्यंत पोलिस जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवू शकतील.
 • पोलिसांनी या गर्दीचे चित्रण केल्यास कुणाला यातून लागण झाली तरी संपर्कात आलेल्यांचा शोध सहज घेता येईल.                                                                                                                 महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

स्वॅब घेतलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास या रुग्णाचा अंतिम अहवाल येईपर्यंत मृतदेह रुग्णालयाने राखून ठेवायला हवा. ही चांगली सूचना आहे. जसे जिवंत व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत आम्ही त्याला रुग्णालयातच ठेवतो; तसेच मृतदेह डिस्पोज करू नये, हे योग्य राहील. याचा जरूर विचार व्हावा.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona - Immediate Control Of The Crowd At The Funeral home