
वाळूज (जि. औरंगाबाद) - दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परिसरातील प्रतिपंढरपूर येथे बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा धाडसी निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने विठ्ठल-रखुमाई मंदिरात झालेल्या बैठकीत सोमवारी (ता.१५) घेण्यात आला.
ये-जा वाढली अन् कोरोनाही
लॉकडाउनदरम्यान पंढरपूर ग्रामपंचायतीने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही, परंतु अनलॉक झाल्यापासून गावात वर्दळ वाढली. त्यामुळे कोरोनाची लागण होत आहे. यापुढे गंभीर स्थिती होऊ नये म्हणून पंढरपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात सरपंच शेख अख्तरभाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामसेवक नारायण रावते, एकनाथ सोनवणे, एकनाथ किर्तीकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सम-विषम याप्रमाणे दुकाने सुरू न ठेवता सरसकट बुधवार ते शुक्रवार हे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या जनता कर्फ्यूमधून दवाखाने व औषधी दुकाने वगळण्यात आली आहेत.
...तर पाच हजारांचा दंडही
जनता कर्फ्यूचे उल्लंघन केल्यास ५ हजारांचा दंड व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठेवण्यात आला आहे. या बैठकीत चांगली सेवा देणाऱ्या आरोग्यसेवक, सेविका व आशा कार्यकर्तींचा सत्कार करण्यात येऊन नव्याने चार आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यासाठी जि.प.कडे पाठपुरावा करणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे, त्याचप्रमाणे प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून नागरिकांना औषधीचे वाटप करण्याचे ठरवण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, अप्पासाहेब साळे, महेबूब चौधरी, राजेंद्र खोतकर, अनिल कोतकर, तस्लीम शेख, अंजिराबेगम शेख, फिरोजा शहा, पूजा उबाळे, सुमन खोतकर, मीरा गिर्हे, संगीता गायकवाड आदींनी जनता कर्फ्यूचे समर्थन करीत नागरिक व व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.