अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

 नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटीव्ह, चाळीस जण क्वारंटाईन  

अजिंठा (जि. औरंगाबाद) :  अजिंठा येथे रविवारी (ता. सात) दोन साखरपुडे झाले. यावेळी सुमारे शंभरजण उपस्थित होते. दोन दिवसांनंतर साखरपुडा झालेल्या एका नवरदेवाचे औरंगाबाद येथे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अजिंठ्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाने खबरदारी म्हणून त्याच्या नवरीसह चाळीस जणांना होम क्वारंटाईन केले आहे. 

औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत काम करताना एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्या तेवीस वर्षीय नवरदेवास कोरोना झाल्याचे सांगितले जाते.  अजिंठा येथील तेलीपुरा भागात रविवारी एकाच घरातील दोन मुलींचा साखरपुडा झाला. एक नवरदेव औरंगाबादचा तर दुसरा अटनगाव येथील होता. दोन्हीकडील मिळून शंभरावर नागरिक साखरपुड्याला हजर होते. दरम्यान, औरंगाबादला गेल्यावर कोरोनाची लक्षणे आढळत्याने नवरदेवाच्या लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल मंगळवारी (ता. नऊ ) पॉजिटिव्ह निघाला. ही माहिती कळताच नवरदेवासह साखरपुड्याला उपस्थित सर्वांमध्ये खळबळ उडाली. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डोंगळीकर, डॉ. जवेरीया , पर्यवेक्षिका अनिता राठोड, रेखा कापकर, आरोग्य सेवक वाय. एन. सपकाळ, सरपंच दुर्गाबाई पवार, राजेश ठाकरे, ग्रामसेवक सैवार, अली चाऊस, आशा स्वयंसेविका दुर्गाबाई पुरे, संध्या बोरारे, पौर्णिमा बिरारे, शरदाबाई, प्रमिलाबाई शिवना प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक साखरपुडा झालेल्या घरी गेले. तेवीस वर्षीय कोरोना बाधीत नवरदेवाच्या संपर्कात आलेल्या जवळच्या चाळीस जणांना होम क्वारंटाईन केले. काहींना शेतातील घरी पाठविले तर काहींना घरातच राहण्याचा सल्ला दिला. दोन दिवसात नवरदेवाच्या जास्त संपर्कात आलेल्या बारा जणांचे स्वॅब घेण्यात येतील, अशी माहिती डॉ. जवेरिया यांनी दिली. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
 

चोवीस तासांतील अपडेट 

घाटी रुग्णालय, औरंगाबाद 

  • दहा जून ते अकरा जून सायंकाळी चारपर्यंत ५१ रुग्णांची तपासणी. 
  • ३० रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली. 
  • ९ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. 
  • ६ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह. १५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा. 
  • घाटीत एकूण १९१ रुग्णांवर उपचार. 
  • यातील एकूण १५२ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण. 
  • ९५ गंभीर रुग्ण, तर सामान्य स्थितीत ५७ रुग्ण. 
  • २८२४ रुग्ण कोविड निगेटिव्ह, १५ संशयित रुग्ण. 
  • पाच पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा रुग्णालयातून घाटीत भरती. 

 
‘घाटी’तून ११ जणांना आज सुटी 
घाटी रुग्णालयातून ११ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर आज सुटी देण्यात आली आहे. यात मुझफ्फरनगर, मझारपुरा, नारळीबाग, संजयनगर, रहेमानिया कॉलनी, जुना बाजार, भारतमातानगर, टीव्ही सेंटर, बुढीलेन, कटकटगेट, केसापूर, ता. कन्नड येथील रुग्णांचा समावेश आहे. यात तीन महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groom reports corona positive at Ajanta