...अन्यथा सुरक्षा दलाचा वापर करावा लागेल : आस्तिककुमार पांडेय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

नागरिक महापालिकेच्या पथकांना सहकार्य करण्यास तयार नाहीत. मात्र अडथळे आणणाऱ्यांचा हेतू कधीच साध्य होणार नाही. वेळप्रसंगी राज्य सुरक्षा दलाचा वापर करावा लागला तर तेही करू असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. पाच) सांगितले. 

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना काही भागांत मात्र नागरिक महापालिकेच्या पथकांना सहकार्य करण्यास तयार नाहीत. मात्र अडथळे आणणाऱ्यांचा हेतू कधीच साध्य होणार नाही. वेळप्रसंगी राज्य सुरक्षा दलाचा वापर करावा लागला तर तेही करू असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. पाच) सांगितले. 

सोमवारी (ता. चार) सायंकाळी महापालिकेच्या पथकाला कैलासनगर भागात सर्वेक्षण करण्यास विरोध करण्यात आला. नागरिकांनी या पथकासोबत हुज्जत घातली व कामही करू दिले नाही. त्यामुळे पथकाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आस्तिककुमार पांडेय यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले व वेळप्रसंगी राज्य सुरक्षा दलाचा वापर करावा लागला तर तेही करू असे ते म्हणाले. 

शिवसेना तुमच्या पाठीशी 
शहराच्या भल्यासाठी हवे ते करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदारांनी दिली. आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल यांनी पांडेय यांची भेट घेतली. ३० मेपर्यंत एकही रुग्ण राहता कामा नये असा संकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यानुसार काम व्हावे. महापालिका सध्या चांगल्या प्रकारे काम करीत आहे, शहराच्या भल्यासाठी आवश्यक असेल ते सगळे करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आस्तिककुमार पांडेय यांना सांगितल्याचे दानवे यांनी सांगितले. त्यानंतर दानवे, जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी, आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबर संजयनगर – मुकुंदवाडी भागाची पाहणी केली. तेथील नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. 

कोरोना योद्ध्यांना लष्कराने दिली मानवंदना 
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह इतर अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कोरोना योद्ध्यांना मंगळवारी (ता. पाच) महापालिकेत लष्करातर्फे मानवंदना देऊन सन्मान करण्यात आला. प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मानवंदना स्वीकारली. 

छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यू. एस. आनंद, अजय लांबा, हरविंदर सिंह, आर. के. सिंग अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. नागरिकांनी घरातच राहून त्यांना सहकार्य करावे. ब्रिगेडियर यू. एस. आनंद म्हणाले, लष्कराच्या जवानांकडून महापालिकेचे दिवसरात्र काम करणारे अधिकारी-कर्मचारी व शहरातील प्रत्येक नागरिकांना कोरोनाच्या लढ्यात प्रोत्साहन व मान देण्याचा हा प्रयत्न आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad