कोरोनावाहक बनले १,२५३ तरुण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

१८ ते ५० या वयोगटातील व्यक्तींची संख्या १,२५३ एवढी झाली असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच व्यक्ती कोरोनावाहक असल्याचादेखील संशय व्यक्त केला जात आहे.

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ५० वर्षांखालील म्हणजेच तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता अशा रुग्णांची संख्या तब्बल १,२५३ एवढी झाली आहे. विविध कामांसाठी घराबाहेर पडणारे हे तरुण घरात कोरोना घेऊन जात असल्याचा संशय असून, त्यामुळे शहराची चिंता वाढली आहे. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. त्यात १८ ते ५० या वयोगटातील व्यक्तींची संख्या १,२५३ एवढी झाली असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच व्यक्ती कोरोनावाहक असल्याचादेखील संशय व्यक्त केला जात आहे. या खालोखाल पन्नास आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. या वयोगटातील ५७३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. पाच ते अठरा या वयोगटातील २८३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. शून्य ते पाच वयोगटातील ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

३८२ जण क्वारंटाइन 
महापालिकेने संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) ३८२ जणांना ठेवले आहे. कलाग्राममध्ये पाच, एमसीईडी होस्टेलमध्ये ४१, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ९२, हॉटेल मेनॉरमध्ये १०, विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये ८४, नवखंडा येथील वसतिगृहात ८८ तर महसूल प्रबोधिनीमध्ये चार जण आहेत. 

तीन कंटेन्मेंट झोन झाले कमी  
राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कंटेन्मेंट झोन वगळता शहरातील इतर भागात व्यवहार सुरळीत करण्यास मुभा दिली आहे. दरम्यान कंटेन्मेंट झोन असलेल्या १८ भागांपैकी काही ठिकाणी रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि व्यापारी दुकाने उघडण्याची वाट बघत होते. आता तीन भागांतील सर्व निर्बंध उठविले जाणार आहेत. या भागात गेल्या २८ दिवसांत एकही रुग्ण आढळून आला नसल्यास तो भाग कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात येतो. शहरातील पहिला कंटेन्मेंट झोन म्हणून वॉर्ड नंबर १९ आणि २० आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी वॉर्ड १९ हा पूर्णपणे कंटेन्मेंटमुक्त झाला आहे. यातील हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी आयुब कॉलनी, आरेफ कॉलनी कोरोनामुक्त झाले. मात्र वॉर्ड क्रमांक २० अद्यापही कंटेन्मेंट झोनमध्येच आहे.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

कोरोनाच्या पंचवीस रुग्णांवर घरीच उपचार 
सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील २५ जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. गृहविलगीकरणाचे नवे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्याच्या १७ दिवसांनंतर किंवा लक्षणे नसतील तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तीस मुक्त करण्यात येत आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad