esakal | लॉकडाउन टाईट, कोरोनाशी फाईट ; औरंगाबादेत चौथ्या दिवशी कडकडीत बंद  
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

लॉकडाईनच्या उर्वरित दिवसात नागरिकांचा असाच प्रतिसाद मिळाला तर प्रशासनाला कोरोनासोबत ‘फाईट’ करणे शक्य होणार आहे.

लॉकडाउन टाईट, कोरोनाशी फाईट ; औरंगाबादेत चौथ्या दिवशी कडकडीत बंद  

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः लॉकडाऊनच्‍या चौथ्या दिवसीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य रस्त्यांसह सर्वत्र शुकशुकाट कायम असून, सोमवारी (ता. १३) देखील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. मात्र जे कोणी घराबाहेर पडत होते, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून वातावरण ‘टाईट’ केले. लॉकडाईनच्या उर्वरित दिवसात नागरिकांचा असाच प्रतिसाद मिळाला तर प्रशासनाला कोरोनासोबत ‘फाईट’ करणे शक्य होणार आहे. 

कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्येत रोज दीडशे दोनशेने भर पडत असल्याने व बळींचा आकडा तीनशेपार गेल्याने प्रशासनाने शुक्रवारपासून (ता. १०) पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग गांभीर्याने न घेणाऱ्या शहरवासींनी यावेळी मात्र स्वयंशिस्त दाखविली. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील मुख्य रस्ते, चौक एवढेच नव्हे तर गल्लीबोळातही सुनसान वातावरण आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

फक्त अत्यावश्‍यक सेवा देणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स व सकाळच्यावेळी दूध व वर्तमानपत्र पोच करणाऱ्यांची ये-जा सुरू आहे. चौथा दिवसही असाच कडकडीत बंद होता. काही जण आवश्‍यक काम असल्याचे सांगून घराबाहेर पडले मात्र चौकात जाताच त्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’ मिळाला. पोलिसांसह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी देखील शहरात फेरफटका मारून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही, याची पाहणी करत आहेत. 

अयोध्यानगर, शिवशंकर कॉलनीत रुग्ण 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्‍न सुरू असले, तरी शहरात सोमवारी अयोध्यानगर, सातारा परिसर, शिवाजीनगर, शिवशंकर कॉलनी, केशरसिंगपुरा, मित्रनगर, विष्णुनगर या भागांत पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. 
सोमवारी अयोध्यानगर- १३, सातारा परिसर- १६, रेणुकानगर- १०, मसनतपूर- ८, केशरसिंगपुरा- १०, शिवशंकर कॉलनी- ८, मयूरपार्क- ५, मित्रनगर- ४, विष्णुनगर- ४, छावणी भागात- ४, सिडको एन- सहामध्ये चार असे रुग्ण आढळून आले. या भागातील महापालिकेच्या पथकाने धाव घेऊन जंतुनाशकाची फवारणी केली. सर्वांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. लॉकडाउनच्या काळातही या भागातील नागरिकांना घरपोच वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दोन दिवसांत ‘सारी’चे ३९ रुग्ण 
कोरोनासोबतच सारी (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) आजार महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या दोन दिवसांत ३९ रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत ‘सारी’ची रुग्णसंख्या ८५७ एवढी झाली आहे. यातील ८५० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता, २८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ५५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ‘सारी’ने आजपर्यंत १७ जणांचा बळी घेतला आहे. मागील दोन दिवसांत ‘सारी’च्या रुग्णांची संख्या ३९ ने वाढली आहे. शनिवारी (ता. ११) २०, तर रविवारी (ता. १२) १९ रुग्ण आढळून आले. यातील आठजणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.