मोबाईल लोकेशनवरून शोधले सात हजार संशयित, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत

माधव इतबारे
Thursday, 22 October 2020

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याचा धडाका औरंगाबाद महापालिकेने लावला होता.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याचा धडाका महापालिकेने लावला होता. या काळात मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे लोकेशन शोधत सात हजार जणांची चाचणी करण्यात आली, असे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी (ता.२१) सांगितले.

तरूणाचा निर्घृण खून, पत्नी गावाकडून परतली असता घटना आली उघडकीस

शहरात मे, जून, जुलै महिन्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. मृत्यूदरही जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून काही वेगळे प्रयोग करण्यात आले. त्यात एमएचएमएच ॲप तयार करण्यात आला. या ॲपवरून शहरातील ५० वर्षावरील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी करण्यात आल्या. सव्वा लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या नोंदी महापालिकेच्या कोरोना वॉरियर्सने केल्या. तसेच दोनशे गंभीर रुग्णांना विविध कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांचे जीव वाचविण्यात आले.

संशयित नागरिकांचे मोबाईल नंबर घेऊन त्या व्यक्ती आठ दिवसात कोणत्या भागात गेल्या होत्या, याचा शोध मोबाईल टॉवरच्या माध्यमातून घेण्यात आला, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांनी सांगितले. संपर्कातील व्यक्तींच्या शोधासाठी प्रत्येक पथकात दोन पोलीस कर्मचारी देण्यात आले होते. या पोलिसांच्या मदतीने सात हजार व्यक्ती अशा प्रकारे शोधण्यात आल्या व त्यांच्या चाचण्या करून क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव काही प्रमाणात कमी झाला.

नाशिक-परभणीत अनुकरण
शासकीयस्तरावर या ॲपबद्दल प्रशासकांचे कौतुक करण्यात आले. त्यामुळे नाशिक आणि परभणी महापालिकेने देखील एमएचएमएच ॲप तयार करण्याचा निर्णय घेत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला संपर्क साधला. या महापालिकांना माहिती देण्यात आल्याचे पुष्कल शिवम् यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Mild Patient Search Over Mobile Location Aurangabad News