तरूणाचा निर्घृण खून, पत्नी गावाकडून परतली असता घटना आली उघडकीस

रामराव भराड
Thursday, 22 October 2020

वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मातोश्रीनगरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने खून करून फरारी झाले.

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मातोश्रीनगरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने खून करून फरारी झाले. ही घटना बुधवारी (ता.२१) सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. भीमराव दिगंबर सावते (रा. हडहली ता.हदगाव जि.नांदेड) हा रांजणगाव (शेणपुंजी) येथील मातोश्रीनगरात राहत होता. त्याच्याकडे आयशर ट्रक असून तो वाळूज औद्योगिक वसाहतीत ट्रकचे काम पाहतो.

ढगफुटीने औरंगाबाद शहरात दाणादाण, कानठळ्या बसविणारा कडकडाट अन् २४ मिनिटात ५० मिलिमीटर पाऊस

सुमारे तीन महिन्यापूर्वी त्याची पत्नी दोन मुलांसह माहेरी गेली होती. त्यामुळे तो एकटाच राहत होता. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने सावते याच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, मानेवर, दंडावर हल्ला करून त्याचा निर्घृन खून केला. बुधवारी (ता.२१) त्याची पत्नी गावाकडून परत आली असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित आदीसह ठसे तज्ञ व स्वान पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

एकत्र बिर्याणी खाल्ली
मंगळवारी रात्री मृत सावते व मारेकरी सोबत दारू प्यायले व तेथेच बिर्याणी खाल्ली. असे घरात असलेल्या बिर्याणीच्या दोन प्लेट वरून दिसते. त्यामुळे त्याच्या सोबतच्या व्यक्तीनेच भिमराव याचा खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. खून केल्यानंतर आरोपीने घरातील साहित्य व कागदपत्रे अस्ताव्यस्त करून दरोडा पडल्याचा बनाव केला.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Murdered In Rajangaon Aurangabad News