या दांपत्याच्या पुढाकारातून गरजूंना अन्नदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

महापालिकेमार्फत गोर-गरिबांना जेवण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपला एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. आयुक्तांच्या पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही देखील एक महिन्याचा पगार देण्याचे निश्चित केले. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार तर नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन यासाठी घेतले जाणार आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोर-गरिबांच्या दोनवेळच्या जेवायचे वाद्ये झाले आहेत. त्यांना दोन वेळ जेवण मिळावे यासाठी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी योजना राबविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमिवर संपूर्ण शहर ठप्प झाले आहे. श्रीमंतांनी घरात किराणा साहित्याचा मोठा साठा करून ठेवला असला तरी त्यांचे हातावर पोट आहे, त्यांचे मात्र वांद्ये झाले आहेत. दिवसभर मोलमजुरी करून रात्री घरी जाताना आवश्‍यक साहित्य घेऊन जाणाऱ्यांची संख्या शहरात मोठी आहे. काम केल्याशिवाय अनेकांच्या घरची चूलही पेटत नाही. असे कुटुंब लॉकडाऊनमुळे भयभीत आहेत. पुढील २१ दिवस उदरनिर्वाह कसा करावा हा मोठा प्रश्न आहे. अशा कुटुंबाने करावे काय? असा प्रश्न आयुक्तांना भेडसावत होता. त्यांनी मंगळवारी (ता. २४) महापालिकेमार्फत गोर-गरिबांना जेवण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपला एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.

आयुक्तांच्या पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही देखील एक महिन्याचा पगार देण्याचे निश्चित केले. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार तर नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन यासाठी घेतले जाणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांना अन्नदानात आवड असल्यामुळे आयुक्तांनी सर्व जबाबदारी महापौरांवर सोपविली आहे. त्यानुसार महापौरही सर्वाधिक वाटा या जेवणाच्या उपक्रमात टाकणार आहेत. आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका अधिकाऱ्यांसह इतरांची एकूण किती रक्कम जमा होणार याचा अंदाज घेऊन हे काम एका केटर्सला दिले जाणार आहे. केटर्सने तयार करून दिलेले जेवण वॉर्ड कार्यालयांमार्फत वाटप करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. येत्या दोन दिवसात ही योजना सुरू होईल, त्यामुळे ज्यांचे रस्त्यावर पोट आहे, त्यांना दिलासा मिळेल? असे महापौरांनी नमूद केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेने मुख्यालयात उभारली निश्‍चयाची गुढी 
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशभर वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेची प्रकृती ठणठणीत झाली असून, नव्याने पॉझिटिव्ह रुग्णही आढळलेले नाहीत. कोरोना व्हायरसपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी दोन आठवड्यांपासून जिल्हा प्रशासनासोबत महापालिकेची यंत्रणादेखील डोळ्यांत तेल घालून काम करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी नववर्षानिमित्त महापालिकेने ‘आम्ही कोरोनाशी लढण्यास सज्ज आहोत’ असा संदेश देत गुढी उभारली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad