कोरोनापेक्षा सारीचा भयंकर ताप..औरंगाबादेत आठ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सारी या रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरुवारी (ता. २६) दिली. या सर्व रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. सारीमुळे मंगळवारी (ता. २३) एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. आता या रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरुवारी (ता. २६) दिली. या सर्व रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सारी या आजाराची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासारखीच आहेत. या आजारात दोन दिवसांतच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते, त्यात त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांकडून सारीच्या रुग्णांची माहिती मागविली आहे. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आठही रुग्ण हे ग्रामीण भागातील असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार आहेत. 
 
कोरोना अहवाल निगेटिव्ह 
कोरोना व सारी या आजाराची लक्षणे सारखीच असल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांसह इतर तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील चारही जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आढळल्याचे डॉ. पाडाळकर यांनी सांगितले.

एक लाख प्रवाशांचे स्क्रिनिंग
 विमानतळासह शहरात प्रवेश करणार्‍या पैठण-बीडबायपास, हर्सूल टी पॉइंट, जालना रोडवरील केंब्रिज चौक, मुंबई-पुणे मार्गाकडील छावणी नगर नाका या ठिकाणी महापालिकेने स्क्रिनिंग सेंटर  चोवीसतास तैनात ठेवले आहे. अठरा मार्चपासून ते आजपर्यंत एक लाख प्रवाशांचे स्क्रिनिंग या सेंटरवर केले आहे. बुधवारी दुपारी दोन ते गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या वेळात सुमारे साडेतीन हजार  प्रवाशांनी शहरात संचारबंदीतही प्रवेश केल्याचे या तपासणीतून समोर आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad