Coronavirus : आता कोेरोना रुग्णावर घरीच होणार उपचार 

मधुकर कांबळे
Sunday, 7 June 2020

आता सरकारने शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य अथवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलऐवजी त्यांच्याच घरी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबण्याऐवजी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता अतिसौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइन केले जाणार आहे. राज्य सरकारनेच तसा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परिणामी, अशा कोरोना रुग्णांना यापुढे घरीच उपचार दिले जाणार आहेत.

 सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली..कोरोनाबाधित बाळंतणीचा घाटीत मृत्यू 

शहरात कोरोनाची लागण झाली. त्यावेळी सुरवातीला मोजकेच रुग्ण आढळले होते. मात्र, दीड महिन्यात झपाट्याने संसर्ग होत गेला. यामुळे शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. सध्या घाटी रुग्णालय, मिनी घाटी व महापालिकेचे कोविड केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल झाले आहेत.

औरंगाबादप्रमाणे राज्यातील इतर शहरांमध्ये अशाच पद्धतीने कोरोना रुग्ण प्रचंड संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे आता सरकारने शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य अथवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलऐवजी त्यांच्याच घरी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

बापरे... अचानक का वाढला औरंगाबादेत मृत्यूदर 

या आहेत सूचना 

राज्य सरकारच्या वतीने सर्व महानगरपालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइनचा पर्याय उपलब्ध करून देता येईल.

मात्र, त्यासाठी संबंधित रुग्णांच्या घरी त्यांच्या क्वारंटाइनसाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सुविधा उपलब्ध असाव्यात. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. त्याने मोबाईलवर आरोग्य सेतू अप डाऊनलोड करावे व ते सतत कार्यरत असेल याविषयी दक्ष राहावे, असे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
 

किती दिवस होम क्वारंटाइन? 

होम क्वारंटाइन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाइनमधून कधी मुक्त करावे याविषयीही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्याच्या १७ दिवसांनंतर किंवा लक्षणे नसतील तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर होम क्वारंटाइन व्यक्तीस मुक्त करावे. होम क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही शासनाने म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient will now be treated at home