
औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे.
औरंगाबाद : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागातर्फे चिंता व्यक्त केली जात असून, नागरिकांनी संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाय-योजना सुरू केल्या होत्या. त्याचे परिणाम दिवाळीपूर्वी दिसून येत होते. रोज सरासरी ६० रुग्ण आढळून येत होते. मात्र हा दिलासा काही दिवसच राहिला. दसरा, दिवाळीसणानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत झालेली गर्दी, त्यात नियमांचे पालन झाले नसल्याने रुग्ण संख्या वाढेल, अशी भिती आरोग्य विभागाने पूर्वीच व्यक्त केली होती. ती आता खरी ठरत आहे. दिवाळीनंतर चार दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर आहे. रविवार (ता. २२) १०१, सोमवार (ता. २३) १२५, मंगळवार (ता. २४) १२४, बुधवार (ता. २५) ८९ रुग्ण शहरात आढळून आले. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर सांगितले की, दिवाळीनंतर कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या शंभराच्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता वाटते. थंडीही वाढत आहे, त्यामुळे साथीच्या आजाराचे रुग्णही वाढत आहेत.
सर्दी, ताप असेल, तर घ्या डॉक्टरांचा सल्ला
सध्या साथीच्या आजारामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तीन-चार त्रास कायम राहिला तर कोरोनाची चाचणी करून घ्यावी. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन डॉ. निता पाडळकर यांनी केले.
Edited - Ganesh Pitekar