esakal | कोरोना योध्दा : चौदा दिवसांनंतर मी पुन्हा लढायला येणार...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

रुग्णसेवा बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून मुक्त झालेल्या घाटी रुग्णालयातील कोरोनायोद्धा ब्रदरच्या भावना त्यांच्याच शब्दांत.

कोरोना योध्दा : चौदा दिवसांनंतर मी पुन्हा लढायला येणार...

sakal_logo
By
मनोज साखरे

‘‘घाटी रुग्णालयात काम करताना कुठेतरी मी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलो असेल. त्यानंतर खूप ताप आला. डोके आणि पूर्ण अंगात प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्यामुळे मी घाटीत दाखल झालो. चाचणी केली, तेव्हा मला कोविड-१९ ची बाधा झाली, हे डॉक्टरांनी सांगितले. सुरवातीला मी थोडा गांगरलो. पत्नीला हे सांगितल्यानंतर तीही घाबरली. तिची चाचणी केली. ती निगेटिव्ह आली, याचं समाधान होतं. मी लढलो. मला घाटी व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिका, शेजारी, मित्र आणि सहकाऱ्यांनी धीर दिला. आता चौदा दिवसांनंतर आणखी ताकदीने मी कोरोनाशी लढण्यासाठी कामावर येणार आहे...'' अशा भावना आहेत रुग्णसेवा बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून मुक्त झालेल्या घाटी रुग्णालयातील कोरोनायोद्धा ब्रदरच्या.

आपण कुणाच्या संपर्कात आला होता का, संसर्ग कसा झाला? 

- घाटी रुग्णालयाच्या सीव्हीटीएस इमारतीच्या बाजूला कोरोनाची ओपीडी आहे. परंतु तेथे जाण्यासाठी घाटीत आलेल्या रुग्णांना फारशी माहिती नसते. ते थेट कॅज्युअल्टी सेक्शनमध्ये येतात. तेव्हा अशा रुग्णांना बघून ते पॉझिटिव्ह आहेत की नाही हे समजतेच असे नाही. आपण कुणालाही ट्रीट करतो. त्यामुळे एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आला, तर त्याची बाधा झाली असावी. मात्र मी निश्चित सांगू शकत नाही.

बाधा झाली हे कसे जाणवले. काही त्रास झाला का?

- रुग्णालयात भरती होण्याआधी दोन दिवस खूप ताप होता. डोके खूप दुखत होते. शरीराला खूप वेदना होत होत्या. असे वाटायचे की, शरीरावर कोणीतरी मारत आहे, एवढा त्रास सुरू होता. मग मी घाटी रुग्णालयात गेलो.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

रुग्णालयात गेलात तेव्हाची अवस्था काय होती?

- घाटी रुग्णालयात गेलो, त्यावेळी डॉक्टरांनी मला तपासले. एक्स-रे ही काढला; पण पॉझिटिव्ह असेल असे काही वाटले नाही. मला दुसऱ्या दिवशी स्वॅब देण्यास सांगितले. पण काही वेळानंतर मला प्रचंड वेदना जाणवत होत्या; त्यामुळे मग घाटीत लगेच स्वॅब घेतला. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मला पाच एप्रिलला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

तुम्ही पॉझिटिव्ह आलात, त्यानंतर या स्थितीत स्वतःला कसे सावरले? 

- मीही माणूस आहे. मला परिवार आहे. त्या दिवशी मी बऱ्यापैकी घाबरलो; परंतु मला नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा शुभमंगल भक्त, सरचिटणीस इंदुमती थोरात, अधिसेविका छाया चामले, विमल केदारे यांनी धीर दिला. बजाज मॅडम, डॉ. कानन येळीकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य या सर्वांनी धीर दिला. डॉ. सुरेश हरबडे यांनीही संपर्क केला. सर्व सहकारी मित्र यांनी मला मानसिक आधार दिला. 

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

कोरोनामुक्त झालात, आता पुढे काय?

- माझे दहा ते बारा दिवसांनंतरचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर मला सुटी झाली. आता १४ दिवस होम क्वारंटाइन राहणार आहे. त्यानंतर मी पूर्ण ताकदीनिशी लढायला घाटी रुग्णालयात येणार आहे.

तुम्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर मग हे आव्हान कुटुंबीयांनी कसे स्वीकारले? 

- आई, वडील गावी होते. मुलं दीड महिन्यापासून पैठणला आहेत. मी पॉझिटिव्ह आल्यानंतर पत्नीचा धीर सुटला होता. मात्र या प्रसंगातून ती सावरत गेली. तिलाही १४ दिवस क्वारंटाइन केले होते. आता तिचा क्वारंटाइन काळ संपला आहे.

या काळात कुणाकडून वाईट अनुभव आला का?

- नाहीच. उलट सर्वांनी मला सहकार्य केले. मी जेव्हा घरी आलो, तेव्हा माझ्या शेजाऱ्यांनी माझे जंगी स्वागत केले. गेटजवळ मी आलो तेव्हा मला तिथे उभे राहायला सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्याविषयी चांगल्या गोष्टी सर्वांसमोर व्यक्त केल्या. पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. शेजाऱ्यांचा आधार मिळाला. मदत लागली तर सांगा, असे सारखे ते म्हणतात. मी अगदी समाधानी आहे.