
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता. ११) आढावा बैठकीत दिले.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता. ११) आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यातील विविध विकास योजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील विकास कामे व जिल्हा परिषद तथा महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाने, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते. पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, की कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. तसेच केंद्र शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेमध्ये काम करण्यास संधी असून, उद्योग विभाग व जिल्हा प्रशासनाने एकत्रित प्रयत्नातून काम करावे. महानगरपालिकेची विकास कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.
Edited - Ganesh Pitekar