esakal | आठ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला, जागेवरच करण्यात आले शवविच्छेदन
sakal

बोलून बातमी शोधा

Hanumant Gawande

विहामांडवा (ता.पैठण) येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वीस वर्षीय अविवाहित तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (ता.११) विहामांडवा शिवारातील एका शेतात झाडाला लटकलेला आढळून आला.

आठ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला, जागेवरच करण्यात आले शवविच्छेदन

sakal_logo
By
अनिल गाभूड

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : विहामांडवा (ता.पैठण) येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वीस वर्षीय अविवाहित तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (ता.११) विहामांडवा शिवारातील एका शेतात झाडाला लटकलेला आढळून आला. यामुळे विहामांडवा परिसरात एकच खळबळ उडाली असून पाचोड पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विहामांडवा येथील अर्जुन हनुमंत गावंडे (वय २०) हा अविवाहित तरुण आठ दिवसांपासून विहामांडवा येथून बेपत्ता होता. याबाबत अर्जुन गावंडे बेपत्ता असल्याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

यावेळी पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, सहायक फौजदार संजय मदने, पोलिस जमादार आप्पासाहेब माळी, अर्जुन गावंडे यांच्यासह मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने विहामांडवा व परिसरात शोध घेतला. पण अर्जुन गावंडे हा काही मिळून आला नाही. शुक्रवारी दुपारी विहामांडवा शिवारातील अनंता काळे यांच्या शेतात अर्जुन गावंडे याची मोटारसायकल शेतातील कपाशीचे पिकात दिसून आल्याने त्याचा सदर शेतात शोध घेतला असता उसाच्या व कपाशी, तुरीच्या पिकाच्या मधोमध असलेल्या लिंबाच्याचा झाडाला मृतदेह लटकलेला आढळून आला आहे.

या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना व अर्जुन गावंडे यांच्या नातेवाईकांना मिळाली. यावेळी पाचोड पोलिस ठाण्याचे सहायल पोलिस निरीक्षक अतुल येरमे व पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांनी अनंता काळे यांच्या शेतात दाखल झाले. यावेळी अर्जुन गावंडे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरून पंचनामा करून जागीच शवविच्छेदन करण्यात आले. पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षत अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड सहायक फौजदार संजय मदने व आप्पासाहेब माळी करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर