आता लवकरच औरंगाबादेत होणार कोरोना स्वॅबची तपासणी

शेखलाल शेख
Friday, 27 March 2020

३० मार्च पासून घाटी होणार स्वॅबची तपासणी 

व्हीआरडीएल मशीन इन्स्टॉलेशन शेवटच्या टप्प्यात 

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्हीआरडीएल मशीन इन्स्टॉलेशन शेवटच्या टप्प्यात असून सोमवार (ता.३०) पासून सुरु होण्याची शक्यता आहे. स्वॅब नमुने घाटी रुग्णालयात तपासणीस सुरवात झाल्यानंतर याचा संपुर्ण मराठवाड्याला खुप फायदा होणार आहे. पुढील दोन दिवसांत मशिनची गुणवत्ता तपासणी होईल. असे घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हारबडे यांनी सांगीतले. 

कोरोनाचे निदान करणे होणार शक्य 

डेंग्यु, स्वाइन फ्लू सह कोरोनासारख्या विषाणुजन्य आजारांचे निदान करणे शक्य होणाऱ्या व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लॅबोरेटरी ची (व्हीआरडीएल) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) केंद्र सरकारकडून यापुर्वीच मान्यता मिळाली; परंतु निधीअभावी प्रयोगशाळेचे काम रखडले होते. 

हेही वाचा- तो म्हणाला तुला कोरोना झाला अन् मग झाली मारामारी

राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रत्येक विभागात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हीआरडीएल लॅब उभारण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. 

शासनाच्या आदेशानंतर हाफकिनकडून मागील आठवड्यात घाटी रुग्णालयाला व्हीआरडीएल मशीन तत्काळ पाठविण्यात आली. मात्र, या मशीनसाठी लागणाऱ्या अद्ययावत इमारतीचे काम बाकी असल्यामुळे सध्या याचे टीबी विभागाच्या लॅबमध्ये इंन्स्टॉलेशन करण्यात येत आहे. टेस्टींगसाठी लागणाऱ्या कीट लवकरच येणार असून क्वॉलिटी कंट्रोल टेस्ट सुरू करण्यात येईल. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातून पुणे येथे पाठविण्यात येणाऱ्या सर्व स्वॅब तपासण्यांचा अहवाल लवकर प्राप्त होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Testing Machin Government Medical College Aurangabad