file photo
file photo

Corona Virus : सॅनीटायझरचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक 

Published on

औरंगाबाद - कोरोनाच्या साथीमुळे प्रत्येकाच्या हातात, खिशात, बॅगमध्ये हॅण्ड सॅनीटायझर दिसत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी स्वच्छ राहणे व व्हायरसमुक्त हात असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हाताची त्वचाही सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. हॅण्ड सॅनीटायझर वापराचा अतिरेक कालांतराने धोकादायकही ठरू शकतो असे मत या विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

कोरोनाची साथ सुरू झाली आणि काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. शालेय जीवनापासून हात धुवायला, हात कसा धुवायचा हे सर्व शिकवले जाते. देशाचे प्रधानमंत्रीदेखील स्वच्छता राखण्याचे वारंवार आवाहन करत मात्र अनेकजण आमचे हात स्वच्छच आहेत म्हणत हात धुणे टाळत होते. लोकांना आता कुठे स्वच्छतेचे महत्त्व कळले आहे, यामुळे थोड्या थोड्या वेळाने हॅण्ड सॅनीटायझरचा वापर वाढला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हॅण्ड सॅनीटायझरविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख तथा विद्यापीठाचे प्र.-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते म्हणाले, सॅनीटायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण. सॅनीटायझर हे आपल्यासाठी नवीन नाही, यापूर्वीही घरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातोय. हॅण्ड सॅनीटायझरदेखील यापुर्वीपासून रुग्णालयात डॉक्टर्स व अन्य कर्मचारी वापरतात. आता कोरोनाची साथ आल्याने याचा वापर प्रत्येकजण करत आहे. अमेरिकेमध्ये गेल्या महिन्यात याची तीनशे ते साडे चारशेपटीत विक्री वाढलेली आहे. 

साबण आणि कोमट पाणी सर्वोत्तम 

डॉ. वक्ते म्हणाले, जिथे हात धुण्यासाठी पाण्याची उपलब्धता नाही तिथे हॅण्ड सॅनीटायझरचा वापर केला जातो. यामध्ये ६० ते ९५ टक्के अल्कोहोल किंवा इथेनॉल असते. याशिवाय त्यात ते हातावर टाकल्यानंतर घट्टं व्हावे यासाठी थिकनींग एजंटचा वापर होतो. तसेच मॉयश्‍चरायजींग एजंट म्हणुन ग्लिसरीनचा वापर होतो. सुवासिकपणा येण्यासाठी काही फ्लेवरींग एजंट टाकलेले असतात.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हात स्वच्छ व विषाणुमुक्त होणे हे तर महत्त्वाचे आहेच, त्याचबरोबर हाताची त्वचाही चांगली राहिली पाहिजे. गरज असेल तरच हॅण्ड सॅनीटायझरचा वापर करावा. दर पाच दहा मिनिटाला याचा वापर करून अतिरेक होत असेल तर याचे धोकेही आहेत. 
अतिवापराने त्वचेला रखरखीतपणा येऊ शकतो, थोडी खाज येऊ शकते. यासाठी सॅनीटायझरच्या वापरानंतर मॉइश्‍चराइजर वापरावे. काही हॅण्ड सॅनीटायझरमध्ये मॉइश्‍चराइजर असते. आपल्या त्वचेचे रक्षण करणारे चांगलेही बॅक्टेरीया असतात जे हानिकारक बॅक्टेरीयापासून आपले रक्षण करतात.

सॅनीटायझरमधील ट्रायक्लोसान हे जरी ॲन्टीबॅक्टेरीयल असले तरी काही विशिष्ट बॅक्टेरीयांच्याबाबतीत रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. काही गोष्टींची ॲलर्जी होऊ शकते. मात्र हे दुष्परिणाम सॅनेटायझरचा अतिरेक केला तरच होऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले. साबण आणि कोमट पाण्याने हाताची घाण, माती, मळ, विषाणू खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. गरज असेल तेव्हाच हॅण्ड सॅनीटायझर वापरा, अतिरेकी वापर टाळा आणि सुरक्षित रहा असे डॉ. वक्ते यांनी आवाहन केले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com