esakal | Coronavirus : बालकांना कोरोना होतो का, चीनमध्ये काय झाले? डॉक्टर म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Has Infected  very few Children

लहान मुलांना या आजाराचा धोका किती आहे, जर बाळाला कोरोनाचा संसर्ग झालाच तर त्याला कोवीड-१९ आपल्या विळख्यात घेणार का, या बाबत eSakal.com ने वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलून जाणून घेतलेली माहिती..

Coronavirus : बालकांना कोरोना होतो का, चीनमध्ये काय झाले? डॉक्टर म्हणतात...

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद - संपूर्ण जगावर कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोवीड-१९ या आजाराचे संकट आहे. प्रत्येक जण काळजीत आहे. यात सर्वाधिक काळजी आहे ती लहान मुलांच्या आई-वडिलांना. जर चुकून आपल्या मुलांना कोवीड-१९ ने ग्रासले तर काय, हा विचारच त्यांच्या काळजाची चाळणी करीत आहे. अनेकांची तर झोप उडाली आहे; पण लहान मुलांना या आजाराचा धोका किती आहे, जर बाळाला कोरोनाचा संसर्ग झालाच तर त्याला कोवीड-१९ आपल्या विळख्यात घेणार का, या बाबत eSakal.com ने वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलून जाणून घेतलेली माहिती..

धोका कमी; पण संसर्ग होऊ शकतो

बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांचा ‘सकाळ’च्या २१ मार्चच्या अंकात एक लेख प्रसिद्ध झाला. या लेखात डॉ. अन्नदाते यांनी म्हटले की, ‘कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की, लहान मुलांना याचा धोका कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो; पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य आहेत. ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लूसारखी लक्षणे कोरोनामध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. याची तीव्रता मोठ्या व्यक्तींएवढी नाही. अगदी तुरळक स्वरूपाचा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, तसेच सर्व वयोगटामध्ये लहान मुलांमध्ये हा मृत्यूदर कमी, म्हणजे ०.२ टक्के आहे. तोही कुपोषित, हृदय रोग, जन्मजात फुप्फुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

आतापर्यंत १० वर्षातील मुलांचा मृत्यू नाही; पण काळजी घ्या

इंडियन मेडिकल असोसिएशनचे वाशीम जिल्हाध्यक्ष  डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले, ‘‘कोरोनामुळे अद्याप शून्य ते नऊ वयोगटातील एकाही बालकाचा मृत्यू झालेला नाही; पण काळजी घेणे गरजेचे आहे. इंग्लंडमधील ‘द सन’ या प्रसिद्ध वर्तमानपत्रातील एक बातमी नुकतीच वाचली. या बातमीनुसार लंडनमध्ये एका नवजात बाळालाही कोरोनाचा संसर्ग झाला. हे बाळ जगातील सर्वांत कमी वयाचे कोरोना बाधित ठरले. त्याच्या आईपासून त्याला हा संसर्ग झाला. यातूनच बाळालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या.

सध्या काळात मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. अपरिहार्य कारणाने घरातील कुणा सदस्याला वारंवार घराबाहेर जावे लागत असल्यास त्याने योग्य ती काळजी घ्यावी. शक्यतोवर बाळापासून दूरच राहावे. योग्य काळजी घेतली तरीही हात-पाय स्वच्छ धुतल्यानंतरच बाळाला स्पर्श करावा. बाहेर जाणाऱ्यांनी कपडे रोजच्या रोज धुवावेत. बाळाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्याला पौष्टिक आहार द्यावा, ‘व्हिटॅमिन सी’युक्त फळे, लिंबू, संत्रे, मोसंबी द्यावी. बाळामध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला आला तत्काळ डॉक्टरांना दाखवा.’’ 

चीनमधील बाधित मुलांवरील संशोधन असे 

हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या फॅकल्टी एडिटर तथा स्वतः एमडी असलेल्या क्लेअर मॅककार्थी यांनी या संदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, संशोधन करून हार्वर्ड हेल्थसाठी एक लेख लिहिला. या लेखानुसार, चीनमध्ये १६ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २ हजार १४३ मुलांना कोवीड-19 चे संक्रमण झाले. प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत संक्रमण झालेल्या ९० टक्के बालकांमध्ये कोवीड-१९ चा परिणाम सौम्य दिसून आला. त्यांना ताप आणि खोकला होता. पण, श्वास घेण्यास त्रास जाणवला नाही. त्यामुळे या ९० टक्के मुलांना व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासली नाही. या काळात केवळ एका १४ वर्षीय बाधित मुलाचा मृत्यू झाला.

असे असले तरी एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे; कारण उर्वरित १० टक्के बालकांच्या अभ्यासानुसार एका वर्षातील १०.६ टक्के बालकांमध्ये हा आजार गंभीर होता. हेच १ से ५ वर्ष वयोगटात ७.३ टक्के, 6 ते १० वयोगटात ४.२ टक्के, ११ ते १५ वर्ष वयोगटात ४.१ टक्के प्रमाण होते. 


 
मुलांमधील कोरोना टाळण्यासाठी  

डॉ. अमोल अन्नदाते म्हणतात, घरात किंवा आजूबाजूला कोरोनाचा रुग्ण असल्यास मुलांना कोरोनाच्या रुग्णापासून लांब ठेवावे. भविष्यात शाळा सुरू झाल्यावरही मुलाला खोकला व ताप असल्यास आठवडाभर शाळेत पाठवू नये. कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम उपाय हात धुणे आहे. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. लहान मुलांसाठी अल्कोहोलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर वापरू नये. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी. मुलांना जेवणाआधी व नंतर, शौचालयाचा वापर केल्यावर व बाहेरून खेळून आल्यावर हात धुण्यास सांगावे. त्यांना हात धुतल्यावर पुसण्यासाठी दुसरा छोटा नॅपकिन ठेवावा. या निमित्ताने या सवयी त्यांना लावाव्यात. 


 
डॉक्टरांचा सल्ला घ्या, भरपूर पाणी प्या 

औरंगाबाद येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मंजूषा शेरकर म्हणाल्या, ‘‘कोरोना म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीची परीक्षाच आहे. बारा वर्षांखालील मुले आणि वयस्कर नागरिकांना अधिक भीती आहे. लहान मुलांमध्ये शरीराच्या आकाराच्या मानाने विषाणूंचा भार जास्त होऊ शकतो. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहण्यासाठी गर्दी करू नये. नवजात बालकांना आई आणि ठरावीक नात्याशिवाय कोणीही हात लावू नये. स्वच्छ हात घेऊन अथवा हाताला सॅनिटायझर वापरून बाळाला स्पर्श करावा. बाळाला आईचेच दूध पाजावे म्हणजे आपसूकच विषाणूपासून संरक्षण होईल. बाळाला दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावे. शाळकरी वयाच्या मुलांना हात स्वच्छ ठेवण्याची सक्ती करावी. खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा भरपूर पाणी प्यावे. पौष्टिक सकस आणि नैसर्गिक आहार घ्यावा. जंकफूड अपायकारक ठरू शकतो. नर्सिंग होममध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्जिकल मास्कचा वापर केला पाहिजे. सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीपासून एक ते दीड मीटर अंतर अंतरावरूनच बोलावे. स्पर्श टाळावा तसेच बाहेरून मागवले जाणारे अन्नपदार्थ खाणे बंद करावेत.’’

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बाातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा