CoronaVirus :योद्धेच कोरोनाच्या विळख्यात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

प्रशासन असंवेदनशील, घाटी रुग्णालयाची बेफिकीर यंत्रणा 

औरंगाबाद ः कोरोनाचे संकट गडद होत असताना घाटी रुग्णालयाची यंत्रणा मात्र बेफिकीर आहे. कोरोनाने घाटी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. रविवारी (ता. २०) दुसऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशासन मात्र बेफिकीर आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरविण्यापासून ते ड्युटी लावण्यापर्यंतचा असंवेदनशील कारभार संताप निर्माण करणारा आहे. 
कोरोनाच्या लढाईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची गरज असताना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात असंवेदनशील कारभार पाठ सोडण्यास तयार नाही. त्यामुळे कर्मचारी काम करताना अक्षरशः धास्तावून गेले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी, रुग्णवाहिकाचालक, स्वच्छता कर्मचारी अशा सर्वांचेच महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे; मात्र घाटी प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याचा असंवेदनशील कारभार समोर आला आहे. दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. अद्यापही सर्व कर्मचाऱ्यांचे ५० लाखांचे विमा फॉर्म भरून घेतलेले नाहीत किंवा आस्थेवाईक चौकशीही केली नाही, हे असंवेदनशीलतेचेच लक्षण आहे. साफसफाई, स्वच्छतेचा अभाव आहे, तोकड्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आलेला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या महिनाभरापासून सुटी मिळालेली नाही. सततच्या ड्युटीमुळे कर्मचारी तणावात आहेत. दुसरीकडे मर्जी सांभाळणारे अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने काम न करता घाटी परिसरात भटकंती करीत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोविड, नॉन कोविड एकत्रच 

कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण किंवा अन्य व्यक्तीच्या संपर्कात न येणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे; मात्र घाटी प्रशासनाला काहीही देणे-घेणे नाही. सर्वच पेशंट अपघात विभागात येतात. तेथून कोरोना संशयिताला कोविड तपासणीसाठी पाठविले जाते. तोपर्यंत हा संशयित रुग्ण अपघात विभागात अनेकांच्या संपर्कात आलेला असतो. या बेफिकीरपणामुळेच कर्मचाऱ्यांसह अन्य रुग्णांची कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढलेली असते. हा प्रकार कर्मचाऱ्यांवर बेतू शकतो, याबद्दल प्रशासनाला काहीही देणे-घेणे नाही. मुळात ओपीडी प्रवेशद्वारावरच कोविड, नॉन कोविड तपासणी करून कोविड रुग्णाला कोविड वॉर्डात पाठविण्याचे साधे गणित प्रशासनाला का कळाले नाही, असा प्रश्न आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेहाल 

कोरोना संकटाच्या परिस्थितीमध्ये साफसफाईचे काम फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच सफाई कर्मचाऱ्यांचे स्थान महत्त्वाचे आहे; मात्र घाटी प्रशासन कंत्राटी सफाई कामगारांचे महत्त्वच लक्षात घेण्यास तयार नाही. उलट कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप करून आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व संबंधिताकडे तक्रारी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना माणुसकीने वागवावे, अशी मागणी केलेली आहे. अत्यंत तोकड्या वेतनात या कर्मचाऱ्यांना राबवून घेण्यात येत आहे. कोरोना गाइडलाइनप्रमाणे सात दिवस सुटी, सात दिवस क्वारंटाइन पद्धतीने काम देण्याऐवजी राबवून घेतले जात असल्याच्या तक्रारी कामगार करीत आहेत. 

सुरक्षा साधने नावालाच 

कोरोनाच्या अनुषंगाने घाटी रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी हा हायरिस्क झोनमध्ये आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, गरजेनुसार फेस शिल्ड, पीपीई किट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; मात्र यातही चालबाजी केली जात असल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. कंत्राटी कर्मचारी तर विनामास्क आणि हँडग्लोव्हजशिवाय काम करीत असताना सर्रास दिसत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना मास्क आणि हँडग्लोव्हज दिले जात नाही. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मेहेरबानीवर मिळाला तर मास्क, हँडग्लोव्हज मिळतो, अन्यथा तसेच रुमाल बांधून काम करावे लागते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

शिक्षण-प्रशिक्षण नाही 

कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या बाबतीत वारंवार बदलत्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण गरजेचे आहे. कुठल्या कर्मचाऱ्याने कशा पद्धतीने काम करावे, काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण देण्याऐवजी निव्वळ फार्स करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे काम कसे करावे, हे न समजल्यानेच दुर्दैवाने दोन बळी गेले आहेत. 

अपघात विभागासमोरचा गोंधळ 

अपघात विभागासमोर कायम वाहतुकीची कोंडी असते. विशेष म्हणजे यासाठी नियुक्त केलेले सुरक्षारक्षक त्याकडे लक्ष देत नाहीत. अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचावेत यासाठी रुग्णवाहिकाचालक रस्त्यावर धोके पत्करत एक-एक मिनिट वाचवत घाटी रुग्णालयापर्यंत येतो, त्यावेळी अपघात विभागासमोरची गर्दी, खड्डे, वाळू, खडी रेती हे अडथळे पार करीत मोठा वेळ घालवत रुग्णवाहिका थांबविण्यास जागा मिळते. त्यानंतर स्ट्रेचर जागेवर नाही म्हणून पुन्हा ताटकळत उभे राहावे लागते. यामध्ये दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वेळ जातो, ही वस्तुस्थिती आहे. 

घाटी रुग्णालयात थेट कोविडशी संबंधित रुग्णांच्या संपर्कात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरविली जात आहेत. ‘घाटी’तील पूर्वी मृत्यू झालेला कर्मचारी कामावर नव्हता. त्यामुळे कोरोनाने एकाच कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. 
- सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक 

घाटी रुग्णालयातील कर्तव्यावर असताना कंत्राटी कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा होणे किंवा मृत्यू होणे याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेतल्याप्रमाणे वागत आहे. 
ॲड. अभय टाकसाळ, सचिव, आयटक संलग्न, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Infected Covid, Ghati Administration Insesitive