यंदाही विद्यार्थ्यांना मिळणार दोन मोफत गणवेश...पण नियम मात्र बदलला...

संदीप लांडगे
Sunday, 12 July 2020

ऑगस्ट किंवा सप्टेंबरपूर्वी गणवेश विद्यार्थ्यांना देण्याची तयारी जिल्हा परीषद शिक्षण विभागाने केली आहे. यात प्रति विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी सहाशे रुपये मिळणार

औरंगाबाद ः कोरोनामुळे शाळा कधी सुरु होतील याबाबत संभ्रम असला तरी जिल्ह्यातील दोन हजार ७६ शाळांतील एक लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरपूर्वी गणवेश विद्यार्थ्यांना देण्याची तयारी जिल्हा परीषद शिक्षण विभागाने केली आहे. यात प्रति विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी सहाशे रुपयेप्रमाणे आठ कोटी ७७ लाख ९० हजार दोनशे रुपयांची तरतूद आहे. यंदाही थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा न करता शालेय व्यवस्थापन समितीकडून गणवेश दिले जाणार आहेत. 

मुख्याध्यापकांनी सांगितले, की गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून कायमस्वरुपी वगळला आहे. मंजूर निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार दिला जाईल. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या स्तरावरुन गणवेश पुरवठा करण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिंक कार्य योजना व अंदाजपत्रकात भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने १८ जून २०२० ला गणवेशासाठीच्या तरतुदीला मान्यता दिली आहे. त्यानुसार जि.प. शाळांतील पहिली ते आठवीमधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची मुले व दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना गणवेश देण्यात येतात. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  

यात प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी प्रत्येकी रुपयांची तरतूद आहे. यावर्षीही दोन गणवेश दिले जातील. विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग, प्रकार ठरवून पुरवठा करण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एक लाख चार हजार ८६० मुली, एससी विद्यार्थी - १५ हजार ४०२, एसटी विद्यार्थी -१० हजार ५७७, बीपीएल पालकांची मुले-१५ हजार ४७८ असे एकूण एक लाख ४६ हजार ३१७ एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी आठ कोटी ७७ लाख ९० हजार दोनशे रुपयांच्या तरतूदीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. 

ही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   
 
गणवेश लाभार्थी विद्यार्थी 
-एकूण मुली ः १,०४, ८६० 
-एससी मुले ः १५,४०२ 
-एसटी मुले ः १०,५७७ 
-बीपीएल धारक पालकांची मुले ः १५,४७८ 
--- 
एकूण ः १,४६,३१७ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Students will Get Free Uniforms but rules have changed Aurangabad