वृद्धाश्रमाने काढले, भीक मागून पोट भरले, पटवर्धन दांम्पत्यांच्या आयुष्यालाच वनवास

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः ऐन कोरोनाच्या काळात हैदराबाद येथील वृद्धाश्रमातून दांपत्याला बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी निजामाबाद, बासर, आदिलाबाद येथील मंदिरांमध्ये भीक मागून कसेबसे पोट भरले. पण एवढ्याने भागणार नाही म्हणून त्यांनी पाण्या-पावसात एकमेकांच्या साथीने औरंगाबादचा रस्ता पायीच पकडला. त्यांची परिस्थिती पाहून एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना औरंगाबादला आणून सोडले. पण इथेही सहारा नसल्याने रोकडीया हनुमान मंदिरात हे दांपत्य आयुष्याचा वनवास भोगत आहे. ही कहाणी कुठल्याही चित्रपटाची नसून प्रत्यक्ष यातना भोगणाऱ्या पटवर्धन दांम्पत्याची आहे. 

थंडीने कुडकुडत ८८ वर्षाचे आजोबा आणि ८० वर्षाच्या आजी एकमेकांचा हात पकडून गुरुवारी (ता.२०) जिल्हा परीषदेत आल्या होत्या. हातात एक गाठोडं होतं. कावऱ्याबावऱ्या नजरेने ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशेने पाहत होते. अचानक हे वृद्ध दांपत्य समाजकल्याण विभागात येवून बसले. दोघांचा चेहऱ्यावर सुरकूत्या पडलेल्या, हातपाय थकलेले, तोंडाला अर्धवट मास्क घातलेले, डोळे अश्रुंनी डबडबलेले... हातात हात कायम ठेवत दोघेही हुंदके देत होते. त्यांना काहीतरी मदत हवी आहे, असे त्यांच्या चेहऱ्यावरुन जाणवत होते. त्यांना बोलते केल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी आजीबाई म्हणाल्या, ‘‘पोरांनो... आम्हाला एखाद्या वृद्धाश्रमात राहाण्याची सोय करता का? मागच्या पाण्यापावासात राहाण्याची खूप तारांबळ होत आहे.

 मुलाकडे का राहात नाही? असे विचारल्यावर आजीबाई सांगू लागल्या, ‘‘तुमच्या सारखा मलाही एक मुलगा होता. खूप शिकवून त्याला मोठं केलं होतं. एका उच्च पदावर नोकरीला होता. पती तलाठी होते. बीडबायपासला मोठं घर होतं. कोणाचीही दृष्ट लागेल असा आमचा संसार होता. १९९९ साली मुलाचं लग्न लावून दिलं, काही दिवसांत सुनेमुळे घरात भांडणं होवू लागली. मुलाचे आमच्यावर खूप प्रेम होते. तीचा त्रास सहन करत त्याने आमचा सांभाळ केला. पण एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधरा दिवसांत सुनेने आम्हाला घराबाहेर काढले. तेंव्हापासून म्हणजे २१ वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या वृद्धाश्रमात कसेबसे जगत आहोत... हे सांगत असताना आजीबाईंच्या डोळ्यातून आश्रूंच्या धारा वाहत होत्या. 

इच्छामरणासाठी 
द्या परवानगी 

उतारवयात माणसे दुबळी आणि हळवी झालेली असतात. त्यांना सुश्रूषा आणि सोबतीचीही गरज असते. अनेकांना स्मृतीभ्रंश होवून ते निराधारपणे भटकत असतात. काहींना म्हातारपणी वृद्धाश्रमात विसावा घ्यावा लागतो. मागील २१ वर्षापासून बाबुराव पटवर्धन व प्रभावती पटवर्धन हे वृद्ध दांपत्य सात ते आठ वृद्धाश्रमात राहिले. प्रत्येक वृद्धाश्रमात त्यांना दुय्यम वागणूक मिळाली. त्यांचा रागराग करणे, कधीकधी खायलाही न देणे असेही प्रकार घडले. शरीरात त्राण नसल्यामुळे कुठे मोलमजुरीही करता येत नसल्यामुळे सगळा त्रास सहन करत जगणाऱ्या या दांपत्याने एखाद्या वृद्धाश्रमात व्यवस्था करुन द्या, नाहीतर इच्छामरणासाठी तरी परवानगी द्या, अशी मागणी करणे म्हणजे समाजाच्याच डोळ्यांत अंजन घालण्यासारखे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com