शाळा बंद, उपासमार सुरू! खासगी शाळेतील शिक्षकांवर भाजीविक्रीची वेळ

संदीप लांडगे
Wednesday, 12 August 2020

कोरोनामुळे कायम विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील २५ हजार ३१८ शाळांवर कार्यरत असलेल्या सुमारे एक लाख दोनशे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे

औरंगाबाद ः मागील चार महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे खासगी संस्थाचालकांनी पूर्णपणे मानधन देणे बंद केले आहे. शाळेच्या वेळानंतर खासगी शिकवणी वर्गातून थोडेफार पैसे मिळत होते, त्यावर उपजीविका होत होती. मात्र, कोरोनामुळे शाळा व शिकवणी बंद असल्यामुळे संसाराची घडीच विस्कटली आहे. घराचे भाडे, दुकानदारांची थकबाकी वाढली आहे, काय करावे सुचत नाही, सध्या मिळेल त्या ठिकाणी कामाला जात आहे, असे एका खासगी संस्थेतील एका शिक्षकाने आपली व्यथा ‘सकाळ’शी बोलताना मांडली.
 
कोरोनामुळे कायम विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील २५ हजार ३१८ शाळांवर कार्यरत असलेल्या सुमारे एक लाख दोनशे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऐन परीक्षेच्या काळात लॉकडाउन सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठा फटका बसला. वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात शालेय शुल्क विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहिल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित वर्गांवर शिकवणारे बहुतांश शिक्षक मार्चपासून विनापगारी आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अनिश्‍चितता आहे. अनेकांनी संसाराचा गाडा सुरू ठेवण्यासाठी भाजीविक्री, दुकानांत काम करणे सुरू केले आहे. तर काही शिक्षक-कर्मचाऱ्यांनी गावाची वाट धरत शेतीत निंदणी, खुरपणी सुरू केली आहे. 

लॉकडाउनचा झटका, आईसक्रीम उद्योगाला चौदाशे कोटींचा फटका  

मराठवाडा विभागात सर्वाधिक म्हणजे २५ हजार ३१८ खासगी विनाअनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. शासनाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर अनेक शाळांना परवानगी दिली. या सर्वांचा कारभार विद्यार्थ्यांच्या शुल्कावरच चालतो. मात्र, कोरोनामुळे पालकांनी शुल्क न भरल्यामुळे संस्थाचालकांनीही पगाराबाबत असमर्थता दर्शविली. शासनाने या शिक्षकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, तसेच कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थाचालक, शिक्षक -कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

रात इंटरनेटला स्पीड मिळत नाही का? हा उपाय करा...

जिल्हा विनाअनुदानित, खासगी विनाअनुदानित शाळा
औरंगाबाद 6044
जालना 2591
परभणी 2897
हिंगोली 1304
नांदेड 3577
बीड 2528
लातूर 2847
उस्मानाबाद 597

शिक्षक संख्या ः १ लाख २०० 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus updates Private Schools Teachers  Are Selling Vegetables Aurangabad