‘त्या’ आयसीटी साहित्याचे पुढे काय झालं? 12 वर्षानंतर तपास

संदीप लांडगे
शुक्रवार, 3 जुलै 2020

केंद्राने देशभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी; तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयसीटी (माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान) योजना सुरू केली होती. यामध्ये केंद्राचा ७५ तर राज्य सरकारकडून २५ टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती

औरंगाबाद ः समग्र शिक्षा (माध्यमिक) अंतर्गत २००७-०८ मध्ये केंद्र पुरस्कृत आयसीटी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील आठ हजार शाळांना तीन टप्प्यात संगणक, सॉफ्टवेअर, इंटरनेट, जनरेटर, कॅमरा असा संच देण्यात आला होता. यासाठी संगणक निदेशकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्यात आल्या होत्या. कालांतराने ही योजना बंद पडल्याने देण्यात आलेले संगणक धूळखात पडले. बारा वर्षांनंतर या लॅबमधील साहित्यांची माहिती शिक्षण विभागाकडून मागवण्यात आली आहे.
 
केंद्राने देशभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी; तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयसीटी (माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान) योजना सुरू केली होती. यामध्ये केंद्राचा ७५ तर राज्य सरकारकडून २५ टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील विविध भागांत तीन टप्प्यात शाळांना संगणक संच देण्यात आले होते. त्यात संगणक, सॉफ्टवेअर, इंटरनेट, जनरेटर, कॅमेरा आदींचा समावेश करण्यात आला होता. यासाठी राज्यभरात आठ हजार संगणक निदेशक व शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्यात आल्या होत्या. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

मात्र योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची मुदत २०१८ मध्ये संपल्यानंतर सर्व कंत्राटी संगणक निदेशकांना शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले; तसेच या आयसीटी लॅब संबंधित शाळांकडे हस्तांतरित करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर दुरुस्तीअभावी शाळांना देण्यात आलेली आयसीटी लॅब या फक्त शोभेच्या वस्तू बनल्या असून, संगणक संच धूळखात पडून असल्याचे चित्र सर्व शाळांमध्ये दिसत आहे. सध्या शिक्षण विभागाकडून शाळांकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या या आयसीटी लॅबची माहिती मागवण्यात आली आहे. 

यात सद्यःस्थितीत किती संगणक सुरू आहे? किती संगणक बंद पडले? इतर साहित्यांची अवस्था कशी आहे? याचा प्रत्यक्ष वापराबाबत आढावा घेण्यासाठी समग्र शिक्षा कार्यालयाद्वारे संबंधित शाळांना लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर मुख्याध्यापक, शिक्षकांनी आपापल्या शाळेतील आयसीटी लॅबची माहिती भरण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना दिली आहे. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
-- 
ग्रामीण भागातील शाळेत लॅबची वाताहत 
औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३०, दुसऱ्या टप्प्यात ७७ व तिसऱ्या टप्प्यात १४० अशा एकूण २४७ आयसीटी लॅब सुरू करण्यात आल्या होत्या. कालांतराने या लॅबनंतर संबंधित शाळांकडे हस्तांतरित करण्यात आल्या; परंतु लॅबसाठी लागणारे जनरेटर व इतर खर्चाचे नियोजन कसे करायचे असा प्रश्‍न शाळांपुढे होता. याबाबत संबंधित कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या; पण या तक्रारीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील अपुरी व्यवस्था, विजेचे नसलेली सोय, भारनियमन, इंटरनेटचा अभाव यामुळे या संगणक लॅब धूळखात पडल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Updates What Happened to ICT Literature The Investigation Began After 12 Years