धक्कादायक : कोरोना रुग्णांच्या जेवणात अळ्या, बजाजनगरातील प्रकार

Covid Hospital has no Facilities at Walun Bajaj Nagar
Covid Hospital has no Facilities at Walun Bajaj Nagar

वाळूज (जि. औरंगाबाद) : कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या. तसेच वेळेवर स्वच्छताही केली जात नसल्याने स्वयंपाक घरात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णांनी त्याची छायाचित्रे व्हायरल केल्याने बजाजनगरात मंगळवारी (ता.सात) सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, हा प्रकार स्थानिकांनी वरिष्ठांच्या कानावर टाकल्याने आमदारांसह महसूल व आरोग्य विभागाने तत्काळ भेट देऊन पाहणी केली. 

बजाजनगर येथील कामगार कल्याण भवनात कोविड केअर सेंटर सुरू आहे. येथे ८३ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील रुग्णांना दिले जाणारे जेवण निकृष्ट तसेच त्यात अळ्या आढळून येत आहेत. तसेच स्वयंपाक घरात स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे सर्वत्र खरकटे व दुर्गंधी आहे. शिवाय कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या अस्वच्छतेचे व जेवणातील अळ्याचे फोटो रुग्णांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती स्थानिकांनी दिल्याने आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे, विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपविभागीय आयुक्त ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार किशोर देशमुख, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, गटविकास अधिकारी एम. सी. राठोड आदींनी या सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

यावेळी रुग्णांनी सोमवारी दिलेल्या उपमा व जेवणामध्ये अळ्या व किडे निघत असल्याचे सांगितले; तसेच या ठिकाणी रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी दिले जात नाही, सॅनिटायझर, मास्क दिले जात नाहीत, स्वच्छतागृह व बाथरूमची स्वच्छता केली जात नाही; तसेच अंघोळीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, काँग्रेसचे वाळूजमहानगर अध्यक्ष अर्जुन आदमाने, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई आदींची उपस्थिती होती. 

चौकशी करून सुधारणा करू 
ज्ञानोबा बानापुरे (उपविभागीय अधिकारी) : रुग्णांच्या जेवणामध्ये अळ्या आणि किडे असल्याची माहिती मिळताच बजाजनगर येथील कॉविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. हा प्रकार निश्चितच चुकीचा असून, त्याची चौकशी करून सुधारणा करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com