esakal | कोविड योद्ध्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी धमकी, घाटी प्रशासनाचा अजब कारभार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

घाटी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र काम केले.

कोविड योद्ध्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी धमकी, घाटी प्रशासनाचा अजब कारभार

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोविड योद्धे कंत्राटी कामगारांचे आयटकच्या नेतृत्वाखाली तब्बल ६१ दिवसांपासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मात्र त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी उपोषणकर्त्यांना थेट कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. घाटी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र काम केले. आजही हे रुग्ण सेवा करून उरलेल्या वेळेत एकवेळा दोन कामगार सोशल डिस्टनसींगचे पालन करून मास्क लावून हक्काच्या पगारासाठी गेल्या ६१ दिवसांपासून उपोषण करीत आहेत.

त्यावर तात्पुरता उपाय म्हणून प्रशासनाने नुकताच जानेवारी २०२० चा अर्धवट पगार दिला. मात्र अनेक कामगारांना फेब्रुवारीचे वेतन मिळाले नाही. कडाक्याच्या थंडीत उपोषण करावयास भाग पाडणारे अकार्यक्षम प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या अकार्यक्षमता झाकून सोमवारी (ता. ११) उपोषणाच्या ठिकाणी जावून अधिष्ठातांनी धमकीवजा भाषा वापरली, एकीकडे सरकार कोविड योध्यांचा सन्मान करत असताना घाटी प्रशासन मात्र सरकारच्याच धोरणाला हरताळ फासत आहे. असा आरोप संघटनेचे सचिव ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, किरणराज पंडित, भालचंद्र चौधरी, गजानन खंदारे, मिसाळ यांनी केला आहे. आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

Edited - Ganesh Pitekar