Covishield vaccine: अखेर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल, १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरवात

ई सकाळ टीम
Wednesday, 13 January 2021

औरंगाबादेत कोव्हिशील्ड लसींचे कंटेनर बुधवारी (ता.१३) सकाळ दाखल झाले आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोव्हिशील्ड लसींचे कंटेनर बुधवारी (ता.१३) सकाळ दाखल झाले आहे. या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यात कोल्ड रुमचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुण्यातून सिरम इन्स्टिस्ट्यूटमधून देशात कोरोना लसी पाठविण्यास सुरवात झाली आहे.

देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दिवशी १८ बूथवर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी २६८ बूथ राहणार आहेत. मात्र ती पहिल्याच दिवशी सुरु होणार नाहीत, तर टप्प्या-टप्प्यानुसार संख्या वाढवली जाणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ११ बूथ, तर औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सात बूथवर लसीकरण होणार आहे.

 

कुठे लस मिळणार ?
जिल्ह्यात १६ जानेवारीला सिल्लोड, गंगापूर, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय, कन्नड, पाचोड, खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. तसेच गणोर, पालोद, दौलताबाद, मनूर, निजलगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील बूथवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहराच्या हद्दीत सात ठिकाणी ती दिली जाणार आहे.

लसीकरण कोण करणार ?
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी ३७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. कोणत्या दिवशी लस दिली जाईल. याविषयी मेसेज येईल. मेसेज पोहोचला नाही, तर फोन करुन कोणत्या दिवशी लस दिली जाईल याची माहिती दिली जाणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covishield vaccine Finally Arrived In Aurangabad Aurangabad Latest News