esakal | National Youth Day 2021: शिक्षण अर्ध्यावर सोडले, टोमणेही मिळायचे, पण मेहनतीच्या जोरावर दोघांनी सुरू केली बँक
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story Of Ganesh Mapari And Manoj Mapari

आईवडिलांसह सर्व कुटुंबीय शेतीत राबायाचे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घर खर्चही भागत नसल्याने दोघांनाही दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले.

National Youth Day 2021: शिक्षण अर्ध्यावर सोडले, टोमणेही मिळायचे, पण मेहनतीच्या जोरावर दोघांनी सुरू केली बँक

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : प्रतिकूल परिस्थितीमुळे अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. शेतीचेही काम येत नसल्याने टोमणे खाण्याशिवाय पर्याय नव्हता. रोजंदारीवर एकाने बँकेत पिग्मी एजंट तर दुसऱ्याने सेतु सुविधा केंद्रात काम सुरू केले. पण मन काही रमेना. अखेर मुरमा (ता.पैठण) या खेडेगावात राहणाऱ्या या युवकांनी दैनंदिन रोजंदारीची नोकरी सोडून बँकेची स्थापना करून स्वत:सह दहा जणांना हक्काची नोकरी मिळवून दिली. मुरमा येथील मनोज मापारे व गणेश मापारे यांच्या घरी अठरा विश्व दारिद्रय, दोघांच्या घरी कोरडवाहू शेती.

आईवडिलांसह सर्व कुटुंबीय शेतीत राबायाचे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घर खर्चही भागत नसल्याने दोघांनाही दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले. नोकरीही नाही व शेतीकामही येत नसल्याने गावांतील मित्र टोमणे मारत असत. अशातच गणेश मापारे याने पाचोड (ता.पैठण) येथील एका बँकेत पिग्मी एजंटची तर मनोज मापारे याने एका सेतू सुविधा केंद्रात रोजंदारीवर नोकरी सुरु केली. त्यावर गुजराण होणे अशक्य झाले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी बहिःस्थ प्रवेश घेऊन गतवर्षी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

नंतर त्यांनी शेतीवर बँकेकडून कर्ज घेऊन पाचोड येथे ‘शिवमुद्रा अर्बन’ नावाने बॅंक सुरू करण्यासाठी मुंबई येथे बॅंकिंग वित्तीय विभागाकडे नोंदणी केली. या विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर या युवकांनी ता. १३ मे २०१८ रोजी एक इमारत भाड्याने घेऊन बँक सुरु केली. शून्यापासून सुरवात झालेल्या या बँकेत मनोज मापारे मुख्य कार्यकारी अधिकारी तर गणेश मापारे अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळु लागले. सुरवातीला खाते उघडण्यासाठी कुणी धजावत नव्हते. मात्र आज त्यांच्या बँकेत १६०० खातेदार आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

दोन वर्षांत दीडशे कोटींची उलाढाल झाली असून बँकेत दीड कोटी रुपयांच्या ग्राहकांच्या सुरक्षित ठेवी आहेत. छोट्या-मोठ्या उद्योग उभारणीसाठी १६० जणांना एक कोटी रुपये कर्जवाटप केल्याने त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला. एवढेच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी बारा महिला बचत गटास तीस लाखांचे कर्जवाटप केले. स्वतः रोजगारासाठी धडपडणाऱ्या या युवकांनी बँकेच्या माध्यमातून इतरांच्याही रोजगाराच्या वाटा शोधल्या असुन आज रोजी त्यांच्या बँकेत अक्षय सोनवणे, नारायण टोपे, अंजली गायकवाड, सिमा शेंडगे हे युवक -युवती नोकरी करीत असून पाचोडसह थेरगाव, हर्षी, दावरवाडी व नांदर येथे पिग्मी एजंट नियुक्त करून व्यावसायिकांकडून दैनंदिन रकमेची बचत करण्यास सुरवात केली आहे.

स्वयंरोजगाराचाही मार्ग
दोन्ही युवक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांना कुंटुबियांनाही स्वयंरोजगाराकडे वळविले. त्यासाठी त्यांनी दुग्धव्यवसायास प्रोत्साहन दिले. दोघांनी सामायिकरित्या कुटुंबियांना ११ दुभत्या म्हशी खरेदी करून दिल्या. पहाटेपासुन ते बँकेच्या वेळेपर्यंत हे दोघे चार वैरणीसाठी त्यांना वेळ देतात. दररोज ९५ लिटर दूध निघते. महिन्याकाठी एक लाख २० हजार रुपये या दुग्ध व्यवसायातून मिळते. ढेप, चारा, देखरेखसाठी महिन्यास ७० हजारांचा खर्च होऊन निव्वळ पन्नास हजारांचा नफा हाती येत असल्याने त्यांच्या कुटुंबियांत आनंदाला पारावार नाही. गणेश व मनोज म्हणतात, ‘‘गणिताची साधी आकडेमोड आम्हाला माहित नव्हती, कुणी शंभर रूपयांला ओळखत नव्हते, जिद्द, चिकाटीने आज हातातून कोट्यवधींची होणारी उलाढाल पाहून आमचे मन भरून येते.’’


संपादन - गणेश पिटेकर