esakal | डॉक्टर दाम्पत्याच्या मुलानेच दिली घरफोडीची सुपारी, पोलिसही चक्रावले; दागिन्यांसह दीड लाखांची रोकड चोरली
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

डॉक्टर दाम्पत्याला दोन मुले आहेत. ३ जानेवारीला हे कुटुंब बाहेरगावी गेले होते. तेव्हापासून घराला कुलूप होते.

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलानेच दिली घरफोडीची सुपारी, पोलिसही चक्रावले; दागिन्यांसह दीड लाखांची रोकड चोरली

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : बायजीपुरा भागातील एका डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडून मुलासह त्याच्या साथीदारांनी तब्बल अठरा तोळ्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री समोर आला. या प्रकारानंतर जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली, तेव्हा दोन संशयित फुटेजमध्ये आढळले. दरम्यान, डॉक्टर दाम्पत्याच्या मुलानेच घरफोडीची सुपारी दिल्याचे समोर आल्यानंतर मात्र डॉक्टर दाम्पत्य तक्रार न देता निघून गेले! आता हे दाम्पत्य पोलिसांचा फोनही उचलत नसल्याचे सांगण्यात आले.

ही घटना ४ जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास बायजीपु-यातील गल्ली क्र. ३१ मध्ये घडली. बायजीपुऱ्यात नामांकित डॉक्टर दाम्पत्याचे मोठे घर आहे. त्या शेजारीच त्यांचे मॅटर्निटी होम, सोनोग्राफी सेंटर आणि होमिओपॅथीक हिलींग सेंटर असे रुग्णालय आहे. या डॉक्टर दाम्पत्याला दोन मुले आहेत. ३ जानेवारीला हे कुटुंब बाहेरगावी गेले होते. तेव्हापासून घराला कुलूप होते. त्यांच्या घराशेजारी मोठी पार्किंग व्यवस्था असून, लोखंडी ग्रीलच्या गेटमुळे पार्किंग पुर्णपणे बंद होती. मात्र, जिन्यातून वर जाण्याच्या गेटला जुनेच कुलूप होते. ४ जानेवारीरोजी रात्री हेच कुलूप उघडून दोन चोरटे आत शिरले.

त्यांनी लोखंडी कपाट फोडून लॉकर उचकटत सोन्याचे १८ तोळ्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड असा सुमारे साडेदहा लाखांचा ऐवज लांबवला. ११ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास डॉक्टर एकटेच घरी आले. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी घरात पाहणी केल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जिन्सी पोलिसांना चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे व उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांनाही बसला धक्का
डॉक्टर दाम्पत्याच्या घरात बाहेर आणि आत एकूण दहा ते बारा सीसीटीव्ही आहेत. बाहेरील कॅमेऱ्याचे डायरेक्शन बदलल्यामुळे त्यात चोर कैद झाले नाही. पण जिन्यातील सीसीटीव्हीत दोन्ही चोर कैद झाले. ते जिन्सी भागातील रेकॉर्डवरील चोर असल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी पथकाला पाठवून एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. तो डॉक्टर दाम्पत्याच्या एका मुलाचा मित्र असून, तो देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.

औरंगाबादच्या आणखी ताज्या बातम्या वाचा

त्यानेच सुपारी देऊन घर फोडल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी मुलाला घेऊन या असे डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टर पत्नी आल्यावर तक्रार देतो असे म्हणून निघून गेले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पण डॉक्टर दाम्पत्याने रात्री उशिरापर्यंत तक्रार दिली नव्हती. उलटाच प्रकार घडल्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांचे फोन टाळले. पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी जवळपास २५ वेळा डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

संपादन - गणेश पिटेकर