निर्दयी काकाने दिले पुतण्याला चटके! व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

सुषेन जाधव
Thursday, 15 October 2020

आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे काकाकडे राहत असलेल्या पुतण्यावर पैसे चोरल्याचा आरोप करीत काकाने त्याला बेदम मारहाण करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे.

औरंगाबाद : आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे काकाकडे राहत असलेल्या पुतण्यावर पैसे चोरल्याचा आरोप करीत काकाने त्याला बेदम मारहाण करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या पुतण्याचा व्हिडिओ गुरुवारी (ता.१५) सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळात गोंधळ सुरुच

दरम्यान, पोलिसांनी निर्दयी काकाला ताब्यात घेतले आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे दहा वर्षांचा सोनू (नाव बदलले आहे) हा कांचनवाडी येथे आपल्या काकाकडे राहण्यासाठी आला होता. सोनूचा काका हा नेहमीच क्षुल्लक कारणावरून सोनूला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. बुधवारी (ता.१३) काकाने सोनूने आपल्या पॅंटच्या खिशातून ५० रुपये घेतले असल्याचे आरोप करीत सोनूला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती. तसेच त्याला प्लेट गरम करून पाठीवर आणि चेहऱ्यावर चटके दिले होते. हा प्रकार सोनूच्या घराजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

व्हिडिओमुळे समोर आला प्रकार
निर्दयी काकाला धडा शिकविण्यासाठी आणि निष्पाप मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ तयार करीत सोशल मीडियावर व्हायरल केला. गुरुवारी सकाळपासून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी या व्हिडिओची दखल घेत काकाचा शोध सुरू केला. तो कांचनवाडी भागात राहत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cruel Uncle Torture His Nephew, Video Viral On Social Media Aurangabad News