पीएचडी हवी द्या साठ हजार, मराठवाडा विद्यापीठातील अजब प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डीसाठी ६० हजारांची संशोधक विद्यार्थ्याकडून मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डीसाठी ६० हजारांची संशोधक विद्यार्थ्याकडून मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबात येथील स्थानिक वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्राच्या अधिष्ठातानींच ही मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सदरील संशोधक विद्यार्थ्याची अंतिम मौख्यिक परीक्षा झालेली नाही.

या परीक्षेसाठी येणाऱ्या बहिःस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये, तर राहणे आणि जेवणासाठी अतिरिक्त २० हजार रुपये लागतील असा सल्ला अधिष्ठाताने दिला.
विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील त्या विद्यार्थ्याने पीएच.डी संशोधन पूर्ण करित शोधप्रबंध ता.४ जून २०१८ रोजी सादर केला. हा प्रबंध मूल्यांकनासाठी बहिःस्थ प्राध्यापकांकडे पाठविण्यात आला. मार्गदर्शक तथा अधिष्ठाता प्रशांत अमृतकर यांच्यासह इतर दोन जणांनी मूल्यांकन करुन अहवाल विद्यापीठास सादर केला. त्यानंतर आठ दिवसांच्या आत दोन बहिःस्थ परीक्षकांपैकी एकाला अंतिम मौख्यिक परीक्षेसाठी बोलविण्यात येते.

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

त्यास विद्यापीठ वाहन खर्च, इतर भत्ता देते. त्यामुळे विद्यार्थ्याकडून पैसे मागणे नियमबाह्य असते. साठ हजारांची तरतूद कुठून करावी असा प्रश्‍न संशोधक विद्यार्थ्याला पडला आहे. संशोधनासाठी विद्यापीठ प्रत्येक वेळेस टिमका मिरवत असते. असे प्रकार जर घडत असतील सामान्य विद्यार्थ्यांना संशोधन करणे अवघड होऊन बसेल. त्यामुळे कुलगुरु डॉ.येवले यांनी पुढाकार घेऊन संशोधक विद्यार्थ्याला न्याय मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.

तासिका तत्त्वावर अध्यापनाचे काम
संशोधक विद्यार्थी तासिका तत्त्त्वावर अध्यापनाचे काम करित असून त्यातून आठ-दहा हजार रुपये पगार मिळत आहे. त्यातून घर चालविणे मुश्‍किल झाले आहे. यात मागील दोन वर्षांपासून पीएच.डीचा व्हायवा (मौख्यिक परीक्षा) होत नाही. यामुळे अतिशय निराशा आली. शिक्षण क्षेत्र सोडून चहाची टपरी टाकावी. पुन्हा याकडे येऊ नये, असे वाटते. पीएच.डी ची पदवी द्यायची की नाही, याचा निर्णय कुलगुरु साहेब करतील, अशा भावना विद्यार्थ्यांने सदरील वर्तमानपत्राकडे व्यक्त केल्या आहे. तो राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) उत्तीर्ण आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dean Demands RupeesTo Research Student Aurangabad News