आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

माधव इतबारे
Saturday, 23 May 2020

महापालिकेने तयार केले मोबाईल अॅप  

औरंगाबाद : ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ या अभियानानंतर महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे घोषवाक्य घेऊन मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप शनिवारपासून (ता. २३) नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, मोबाईल फोनमध्ये अॅप डाऊनलोड करून त्यात आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास अवघ्या पाच मिनिटांत संबंधित व्यक्ती कोरोना संशयित आहे की नाही याची पडताळणी होते, असा दावा करण्यात आला आहे. महापालिकेने तयार केलेला राज्यात अशा प्रकारचा पहिलाच अॅप असल्याचेही सांगण्यात आले. 

आरोग्याच्या दृष्टीने अॅप तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतल्यानंतर श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. नागेश डोंगरे यांच्या मदतीने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ (MHMH- Mazi Health Mazya Hati) हे हेल्थ अॅप तयार करण्यात आले. अॅपबद्दल प्रा. डोंगरे म्हणाले, की अॅपमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी, सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह, किडनीविकार याबद्दलची माहिती भरल्यावर काही मिनिटांत तुमचा झोन ठरवला जातो. ग्रीन झोन (सुरक्षित झोन), ऑरेंज झोन (अंडर ऑब्झर्व्हेशन) आणि रेड झोन (बाधित) अशा तीन झोनमध्ये तुम्हाला माहिती मिळते. 

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार 

एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात येण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात; मात्र या अॅपमुळे तीन दिवसांत निदान करता येणे शक्य आहे. तसेच सेल्फ टेस्ट आणि कोरोना वॉरियर्स असे दोन भाग अॅपमध्ये करण्यात आले आहेत. सेल्फ टेस्टमध्ये स्वतः माहिती अॅपवर भरू शकतो. कंटेनमेंट भागांमध्ये कोरोना वॉरियर्सच्या माध्यमातून या अॅपच्या सहाय्याने माहिती भरून घेतली जाणार आहे. स्वतःची माहिती भरण्यासाठी ऑक्सिमीटर असणे गरजेचे आहे. 
 
वॉररूममध्ये डेटा जमा 
हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध असून, एखाद्याने माहिती भरल्यास त्यांचा डेटा महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या वॉररूममध्ये जमा होईल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची माहिती महापालिकेकडे संकलित होईल, असे प्रा. डोंगरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diagnosis of corona in five minutes