esakal | घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

शहरात आढळून आलेल्या आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आहेत. ते ठणठणीत बरे होणारे आहेत. त्यामुळे कोरोनाला घाबरून न जाता स्वतःची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे टास्क फोर्समधील एका तज्ज्ञाने सांगितले.

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - शहरात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक माहिती समोर आली आहे. शहरात आढळून आलेल्या आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आहेत. त्यामुळे कोरोनाला घाबरून न जाता स्वतःची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे टास्क फोर्समधील एका तज्ज्ञाने सांगितले. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

गंभीर लक्षणे असणारांवरच उपचार
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने पाच कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत; तसेच परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर तब्बल पाच हजार जणांवर उपचार करता येतील अशी व्यवस्था केली आहे. एकीकडे कोरोनाविरोधात लढ्यासाठी मोठी तयारी झालेली असताना दुसरीकडे मात्र दिलासादायक माहिती समोर आली आहे. शहरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांच्या नव्वद ते पंचाण्णव टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जात आहे. ज्यांना घरी बसून उपचार घेणे शक्य आहे त्यांना अशा स्वरूपात मुभादेखील दिली जात आहे, तर गंभीर लक्षणे असणाऱ्यांवर उपचार केले जात आहे; मात्र अशा रुग्णांची संख्या कमीच आहे. 

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

मृत्यूचे प्रमाण दोन ते अडीच टक्के
कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण दोन ते अडीच टक्के आहे. इतर आजारांमध्ये देखील एवढे प्रमाण असतेच, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय कोरोनाने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णांना इतरही आणखी काही आजार होते. त्यात प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, मोठी शस्त्रक्रिया झालेले असे रूग्ण होते. त्यामुळे कोरोना झाला म्हणजे मृत्यूच, अशी जी भिती जनमाणसात आहे, ती काढून टाका, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

हे करावेच लागणार 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असली तरी स्वतःची काळजी नागरिकांना घ्यावीच लागणार आहे. त्यात घराबाहेर पडताना मास्क वापरणे, सॅनिटायझर सोबत ठेवणे, ग्लोज वापरणे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सुरक्षित वावर. 

go to top