रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा

राजेभाऊ मोगल
Tuesday, 9 June 2020

शहरातील व्यवहार काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले. दुकानेही सम-विषम पद्धतीने उघडत आहेत. पण हातावर पोट असणारा मजूर, कामगारवर्ग मात्र अजूनही कामाच्या प्रतीक्षेतच आहे. हाताला कामच नसल्याने सध्यातरी त्यांचे हालच होत आहे.

औरंगाबाद - लॉकडाउननंतर ‘बिगीन अगेन’ म्हणत बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. काही जणांच्या हाताला लगेच कामही मिळाले आहे. मात्र, महत्त्वाचा घटक असलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळालेले नाही. त्यामुळे सध्यातरी कामगारांची परवड सुरू असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 

मदत किती दिवस पुरणार?
कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा झाली. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. या काळात हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे मात्र पार हाल झालेत. काही पक्ष, सामाजिक संस्थांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणत मदतही केली. मात्र, ती किती दिवस पुरली, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील सिडको भागात कामगार चौक आहे आणि पीरबाजार येथील चौकात सकाळीच कामगार एकत्र येतात. ही जागा अनेक वर्षांपासून ठरलेली आहे. ज्यांना कामगार हवे आहेत, ती मंडळी येथे येऊन कामगारांना घेऊन जातात. येथे अनेक जणांच्या हाताला काम मिळतच असते. मात्र, सध्या कोरोनाने कामगारांच्या हातचा रोजगार हिसकावला आहे. आता कोरोनासोबतच जगायचे, असे म्हणत बाजारपेठा सुरू करण्यात आल्या. पण, कामगारांच्या हातांना काम देण्याचे कुणीच प्रयत्न सुरू केल्याचे पाहायला किंवा ऐकायला मिळाले नाही. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

कामगार येतात आशेवर
कामगार चौकात सकाळीच ७० ते ८० कामगार येत आहेत. मात्र, काम मिळत नसल्याने रिकाम्या हातानेच त्यांना आपापल्या घरी परतावे लागते. या कामगारांच्या हाताला कुणी काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे की नाही, असा प्रश्‍न गेल्या १२ वर्षापासून कामगार चौकात मजुरी मिळविणाऱ्या विजयने उपस्थित केला आहे. तर पीरबाजार येथे तीन तास थांबून घराच्या दिशेने निघालेले प्रशांत अंबरवाडीकर म्हणाले, की मजुरीसाठी येऊन थांबावेच लागेल. आज ना उद्या रोजगार मिळेल. सध्यातरी हाताला कुठलेही काम मिळत नाही. आम्ही सर्व नियम पाळून कामे करायला तयार आहोत, पण कुणी काम द्यायलाच तयार नाही. पण लवकरच सुरळीत होईल, अशी आशा वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties for laborers due to lack of manual labor