sakal
sakal

Diwali Padwa 2020 : पाडव्या निमित्ताने बाजारपेठेत अडीचशे कोटींची उलाढाल

औरंगाबाद : कोरोनाच्या काळानंतरच्या दिवाळीत बाजारपेठेवर परिणाम जाणवेल असे वाटले होते. मात्र केंद्र सरकार व राज्य सरकारने बाजारपेठे सुरु करीत त्यांना चालना देण्यासाठी केलेले प्रयत्नामुळे बाजारपेठत दसऱ्यापासून नवचैतन्याचे वातावरण आहे.दसऱ्याच्या मर्हुतावर ऑटोमोबाईल, सोने-चांदी,इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत दीडशे कोटींची उलाढाल झाली होती. आता सोमवारी (ता.१६) पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत अंदाजे अडीचशे कोटींची उलाढाल होणार आहे. पाडव्याच्या मर्हुतावर पाचशे चारचाकी आणि अडीच हजार दुचाकीची डिलिव्हरी देण्यात येणार आहे.

दसऱ्यानंतर बाजारपेठेने मोठी उसळी घेतली. उद्योगाचेही शंभर टक्के उत्पादन सुरु झाल्याने आता बाजारपेठा पूर्वपदावर आली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही मुद्रांक शुल्क कमी केल्यामुळे मोठा फायदा मिळाला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी शनिवारी (ता.१४) शहर जिल्ह्यात २०० चारचाकीची डिलिव्हरी देण्यात आली. तर जवळपास एक हजारहून अधिक दुचाकी विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ऑटोमोबाईल क्षेत्र सुसाट
दसऱ्यापासून ऑटोमोबाईल क्षेत्राने मोठी उभारी घेतली आहे. या दिवशी ७५ कोटीची उलाढाल झाली होती. आता पाडवा आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर पाचशे चारचाकी आणि अडीच हजार दुचाकींची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. यंदा चारचाकी वाहनाच्या तीन ते चार आठवड्याची वेटिंग आहे. काहींना तीन आठवडे वाट पहावी लागणार आहे. सुट्या भागांचा तुटवडा असल्याने ही अडचण येत असल्याचे ऑटोमोबाईल महासंघाचे अध्यक्ष राहुल पगारिया यांनी सांगितले.

सोने चांदी खरेदी वाढली
सोन्याच्या किंमती ऐन दिवाळीत कमी झाल्याने ग्राहकांमध्ये मोठा उत्साह होता. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळ पर्यत सोने खरेदी सुरु होती. तर रविवारीही अनेकांनी सोने खरेदी केले. सोमवारी पाडवा आणि भाऊबीज एकत्र आल्याने या दिवाशीही सोने खरेदी होईस अशी माहिती सराफा उदय सोनी यांनी दिली.


इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ तेजीत
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी वेगवेगळ्या बंपर ऑफर्स जाहीर केल्याने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. कंपन्यांनी ५ कोटी रुपयांची लक्की ड्रा, शोरुम चालकातर्फे विशेष सवलत आणि क्रेडिट आणि डेबीट कार्ड, फायनन्स करणाऱ्यांनी १५ ते १७ टक्के कॅशबॅकची सुविधा दिल्या आहे. ५५ इंची एलईडी टिव्ही, वॉशिग मशीन, आणि मायक्रोवेव्ह याला सर्वाधिक मागणी असल्याचे इलेक्ट्रॉनिक्सचे विक्रेते पंकज अग्रवाल यांनी सांगितले.

दोनशेहून अधिक गृहप्रवेश
दसरा-दिवाळी, अक्षय तृतीय या सणाला घर घेणे शुभ मानले जाते. यामुळे दसऱ्याला शंभरहून अधिक गृहप्रवेश झाले होते. तर सोमवारी (ता.१६) पाडव्याच्या मुहूर्तावर शहर व जिल्हात दोनशेहून अधिक गृहप्रवेश होणार आहेत. यासह या दिवशी सर्व बांधकाम व्यावसायिकांकडे तीनशे ते चारशे बुकिंग होण्याची शक्यता क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जाबिंदा यांनी वर्तवली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com