तरुणांचे रोज दीड हजार प्राण्यांना अन्न

शेखलाल शेख
सोमवार, 1 जून 2020

तरुणांनी रोज हजारो घरांमधून चपात्या; तसेच हॉटेलमधून उरलेले अन्न गोळा करायला सुरवात केली. हे अन्न जमा झाल्यानंतर ते भटक्या कुत्र्यांना टाकतात. आता जानेवारी २०२० पासून त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लॉकडाउनमध्ये तर भटक्या कुत्र्यांचे खूप हाल झाले. त्यांचा जीव वाचविण्यासाठी या तरुणांनी मोठ्या प्रमाणात अन्न जमा करून या भटक्या कुत्र्यांना टाकले आहे.

औरंगाबादः लॉकडाउनमध्ये रस्त्यांवरील भटक्या मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. अन्न, पाण्याविना त्यांची उपासमार होत आहे. अशा भटक्या मुक्या प्राण्यांसाठी ॲनिमल पियर्समधील २५ पेक्षा जास्त तरुण देवदूत म्हणून पुढे आले आहेत. वर्ष २०१६ पासून हे तरुण भटकी कुत्री, मांजर, गायी, गाढव अशा प्राण्यांना घाऊ घालत आहेत. विशेष म्हणजे ॲनिमल पियर्सने चिकलठाणा येथे ५० मांजरासाठी तर अब्दीमंडी येथे ५० भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर तयार केले आहे.

या तरुणांनी रोज हजारो घरांमधून चपात्या; तसेच हॉटेलमधून उरलेले अन्न गोळा करायला सुरवात केली. हे अन्न जमा झाल्यानंतर ते भटक्या कुत्र्यांना टाकतात. आता जानेवारी २०२० पासून त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लॉकडाउनमध्ये तर भटक्या कुत्र्यांचे खूप हाल झाले. त्यांचा जीव वाचविण्यासाठी या तरुणांनी मोठ्या प्रमाणात अन्न जमा करून या भटक्या कुत्र्यांना टाकले आहे.

लॉकडाउनमध्ये घरी बनवलेला राईस आणि डोनेशनमधून मिळालेले पॅकेट फूड यातूनच त्या सगळ्या प्राण्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न सध्या ॲनिमल पियर्स करीत आहेत. सध्या प्राण्याची संख्या जास्त आणि अन्न कमी पडत असले तरी हे तरुण त्यांचे नियमित कार्य करीत आहेत. 

३०० ठिकाणी वॉटर पॉट 

भटक्या प्राण्यांसाठी अन्नासोबत जिवंत राहण्यासाठी सगळ्या मोठी समस्या असते पिण्याच्या पाण्याची. उन्हाळ्यात तर या प्राण्यांसाठी कुठेच पाणी नसते. त्यामुळे ॲनिमल पियर्स यांनी या भटक्या प्राण्यासाठी शहरात ३०० ठिकाणी वॉटर पॉट ठेवले आहेत. त्यावर मुक्या प्राण्यांची पाणपोई ॲनिमल पियर्स असे लिहिले आहे. या पॉटमध्ये लोक स्वतःहून रोज पाणी टाकतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांची यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते.

हेही वाचा- मुंगी, टिटवी देते पावसाचा सांगावा जाणून घ्या कसे..

कुत्री आणि मांजरासाठी शेल्टर 

ॲनिमल पियर्सने चिकलठाणा येथे ५० मांजरीसाठी तर अब्दीमंडी येथे ५० कुत्र्यांसाठी शेल्टर तयार केलेले आहे. यामध्ये अनेक भटकी कुत्री, मांजर आहेत. या सर्वांच्या अन्नाची, पाण्याची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. यासोबत शहरातील जवळपास दीड हजार मुक्या प्राण्यांना अन्न देण्याचे काम केले जात आहे. 

तुम्हाला करता येईल मदत

तुम्हाला घराबाहेर पडणं शक्य नसेल तर तुम्ही ॲनिमल पियर्सला अन्नदानासाठी मदत करता येईल. अधिक माहितीसाठी ॲनिमल पियर्सच्या फेसबुक पेज, इन्स्टाग्रामला भेट देता येऊ शकता किंवा AnimalPeers.com या वेबसाईटवर ॲनिमल पियर्सच्या कार्याबद्दलची माहिती मिळेल. तसेच ९४०३७७४०४९ या नंबरवर संपर्क करता येऊ शकतो. 

आम्ही सर्वप्रथम प्राण्यांच्या अन्नसमस्येवर काम करण्याचे ठरवले. भटक्या प्राण्यांच्या समस्या समजून घेऊन त्यासाठी एक संघटन उभे केले. त्यासाठी आम्ही एक संघटन उभे केले आहे. औरंगाबाद शहरातील सर्व भटक्या प्राण्यांना अन्न खाऊ घालण्यासाठी एकत्र येण्याचे व एकमेकांना या कामात मदत करण्याचे आवाहन आम्ही लोकांना करीत आहोत. सध्या आम्ही उभारलेल्या निवारागृहात सुमारे शंभर प्राणी आहेत. हे सर्व करताना आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागतो. 
- ॲनिमल पियर्समधील एक तरुण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog And Cat Shelters, food Aurangabad News