मुंगी, टिटवी देते पावसाचा सांगावा, जाणून घ्या कसे... 

file photo
file photo

औरंगाबाद : लग्नाच्या मांडवात विहीनबाईची लगबग सुरू असते याला निरोप दे, त्याला सूचना कर, घरातून सामान बाहेर आण मध्ये नेऊन ठेव. कोणी बोलायला आले तर कामाची लगबग आणि बोलणेही सुरूच अशी विहीनबाईची लगबग सुरू असते. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर येरझाऱ्या घालणाऱ्या इनबाई मुंग्या म्हणतात.

आता प्रश्‍न पडेल की मुंगी आणि विहीनबाईचा काय संबंध तर पावसाच्या आगमनापूर्वी या मुंग्यांची विहीनबाईसारखीच धावपळ सुरू असते. मुंग्यांसोबतच टिटवी, उंदीर, कावळा, खोंड हे प्राणी पक्षी पावसाचे संकेत देतात. ग्राम्य संस्कृतीतील या पारंपरिक ठोकताळ्याच्या आधारेच शेतकरी कामाला लागत होते. 

रडार, सॅटलाईट अशी अल्ट्रा मॉडर्न हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा आजा आपल्याकडे आहेत. ब्रिटिशकाळापासून हवामान खाते कार्यरत आहे, मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे पावसासंबंधीचे काही ठोकताळे आहेत. या ठोकताळ्यांच्या आधारेच शेतकरी शेतीच्या कामाला लागतात. शेतकऱ्यांचे ठोकताळे आजही खरे ठरत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

टिटवीची अंडी 

कृषी खात्यातील हवामानाचे अभ्यासक उदय देवळाणकर यांनी पावसाची स्थिती कशी असेल, कोणते प्राणी, पक्षी, किटक करत असलेल्या कृतीवरून शेतकऱ्यांनी कसे ठोकताळे तयार केले आहेत, याविषयी सांगितले, सदैव पाण्याच्या ठिकाणी वावरणारी टिटवी तिच्या अंडी घालण्याच्या पद्धतीवरून पावसाळा कसा राहील याचे संकेत देते.

लवणात म्हणजे उताराच्या बाजूने टिटवीने अंडी घातली तर फारसा पाऊस येणार नाही यामुळेच टिटवी लवणात अंडी घालते. जर लवणाच्या वरच्या बाजूने अंडी घातली तर मध्यम आणि उंचवट्यावर टिटवीने अंडी घातली तर भरपूर मोठा पाऊस होणार आहे, त्यामुळेच टिटवी अंडी सुरक्षित राहावी म्हणून उंचवट्यावर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते असा पारंपारिक ठोकताळा आहे. 

उंदीरही सांगतो पावसाची स्थिती 

उंदीर त्याच्या आणि पिलांच्या सुरक्षिततेसाठी शेतात कुठे उकर ( बिळ ) तयार करतात यावरूनही शेतकरी पाऊस कसा पडेल याविषयी अंदाज बांधतात. शेतातून पाणी वाहून जाणाऱ्या बाजूने उकर तयार केली तर पाऊस कमी राहू शकतो आणि शेतात बंधाऱ्यावर किंवा उंचवट्याच्या भागात उकर केली तर त्यावर्षी चांगला पाऊस होईल असे मानले जाते कारण जोराचा पाऊस झाला आणि उकरमध्ये पाणी शिरले तर वाहून, मरून जाण्याची भिती असते यामुळे उंदरांच्या उकरीवरून पावसाचा अंदाज बांधण्याचा ठोकताळा आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कावळ्याची घरटी 

कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेनाचं अशा आई आणि आजीकडून गोष्टी लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. कावळ्याचे घरटे भलेही सुगरणीच्या खोप्यासारखे मजबुत नसेल कावळ्याचे घरटे काड्या काड्या रचून केलेले असते. कावळ्याच्या या घरटे बांधण्याच्या जागेवरूनच शेतकरी पावसाचा अंदाज बांधतात. श्री देवळाणकर म्हणाले, पक्षाला आगामी पावसाचा अंदाज कळतो. त्यानुसार ते आपली तजवीज करतात. कावळे हवेच्या दिशेचा अंदाज घेऊन घरटी बांधत असतात.

जेव्हा खोडापासून निघालेल्या जाड फांदीवर आणि तशाच जाडजूड फांदीच्या खाली घरटे बांधले असेल तर त्याचा अर्थ हमखास आणि जोरदार पाऊस येणार असे सूचित होते. जेव्हा पक्षी उंच शेंड्याकडील फांदीवर घर बांधतो, तेव्हा त्याला पाऊस कमी होणार याचा अंदाज आलेला असतो. गाईचे खोंड (वासरू ) जमीन हुंगून हुंदडते तेव्हा त्याला मातीचा सुगंध येतो आणि त्याचा पावसाचा अंदाज येत असल्याने ते खुशीत येऊन हुंदडत असते. 

मुंग्यांची लगबग 

इवल्याशा मुंगीलाही पावसाचा अंदाज येत असतो. ज्यावेळी मुंग्या तोंडात त्यांची अंडी धरून ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी लगबगीने जातात तेव्हा हमखास पाऊस येतो हे शंभर टक्के सत्य असल्याचा दावा करून श्री देवळाणकर म्हणाले, पावसाला सुरवात झाल्यानंतर मध्येच बराच मोठा खंड पडतो. साधारणतः: २६ जुलै ते २१ ऑगष्ट दरम्यान हा खंड पडतो, त्यावेळी ऊन पडल्यासारखे होते. त्यावेळी मोठे काळे मुंगळे बाहेर पडत असतील तर २४ - २५ तासात पाऊस पडतो असा ठोकताळा आहे. सूर्य मावळतीकडे जाताना त्याची किरणे तिफणीच्या मोग्याप्रमाणे पडत असतील तेदेखील पावसाचे संकेत देतात. कारण जलयुक्त ढगांचे प्रमाण अधिक असेल तर सूर्यकिरण तिफणीच्या मोग्याप्रमाणे पडतात. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पुण्याचे सिमला ऑफीस 

शेतकऱ्यांच्या पावसाविषयीच्या ज्ञानाने ब्रिटिशही प्रभावित झाल्याच्या अनुषंगाने श्री देवळाणकर म्हणाले, असे सांगितले जाते की ब्रिटिशकाळात भारताचे व्हॉईसरॉय सिमला येथे राहत होते. श्रीमती व्हॉईसरॉय त्यांच्या वाढदिवसासाठी पार्टीला जाण्यासाठी बग्गीतून जात असताना एक शेतकरी त्याची औजारे, बाहेर पडलेले सामान झाकून ठेवताना दिसले. त्यांनी बग्गी चालकामार्फत हा शेतकरी काय करतोय अशी विचारणा केल्यावर शेतकऱ्यांने उत्तर दिले. आता पाऊस पडेल यामुळे ही तयारी करतो त्याच्या उत्तराने श्रीमती व्हॉइसरॉयच्या शंकेवरून व्हॉइसरॉयनी तिथल्या हवामान खात्याला विचारणा केली तेव्हा हवामानखात्याने पाऊस येणार नाही निश्चिंतीपणे जा असे उत्तर दिले. मात्र झाले उलटेच पाऊस पडला आणि श्रीमती व्हॉईसरॉय यांच्या पार्टीच्या रंगाचा बेरंग झाला.

त्यावेळी व्हॉईसरॉयनी त्या शेतकऱ्याला बोलावून तू पावसाचा अंदाज कसा बांधला याविषयी विचारणा केली. त्यावर शेतकऱ्याने सांगितले माझे खेचर (गाढव आणि घोड्याचे 
मिश्रण) पाऊस आला तर कानात पाणी जाऊ नये म्हणून कान खाली पाडून उभे होते यावरून मी अंदाज बांधला. यानंतर हवामान खात्याचे मुख्यालय पुण्यात घेऊन जाण्याचे व्हॉईसरॉयने दिल्याचे बोलले जाते. अजूनही पुण्यातील हवामान खाते सिमला ऑफिस नावाने ओळखले जात असल्याची दंतकथा सांगितली. थोड्याफार फरकाने या इतिहासाला हवामान खात्यातील सूत्रांनीही दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com