झारखंडची गेली अन् राजस्थानची आली...

माधव इतबारे
Friday, 14 August 2020

वर्षभरात किमान दहा हजार निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होणे अपेक्षीत असताना सहा हजार कुत्र्यांचेच निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढण्याची धोका वाढला आहे.

औरंगाबाद ः शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र, अपुरी जागा व अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह नसल्याने उद्दिष्ट पूर्ण करताना पशू संवर्धन विभागाच्या नाकीनऊ येत आहे. वर्षभरात किमान दहा हजार निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होणे अपेक्षीत असताना सहा हजार कुत्र्यांचेच निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढण्याची धोका वाढला आहे. दरम्यान झारखंड येथील एजन्सीची मुदत संपल्याने आता राजस्थानच्या एजन्सीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. 

शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास काही वर्षांत वाढला आहे. अनेक भागातील मुख्य रस्ते, चौक विशेषतः ज्या भागात मांस विक्रीची दुकाने आहेत तिथे नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी दहा वर्षांपासून महापालिकेतर्फे प्रयत्‍न सुरू आहेत. मात्र, संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज घडीला शहरात ३० हजारांच्या सुमारास कुत्र्यांची संख्या असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. प्रत्येक वर्षी सरासरी १० हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्यास संख्येला आळा बसेल. पण हे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
वर्षभरात ५० लाखांचा खर्च 
गेल्या वर्षी झारखंड येथील ‘होप’ संस्थेला निर्बीजीकरणाचे काम देण्यात आले होते. वर्षभरात या संस्थेने सुमारे सहा हजार शस्त्रक्रिया केल्या. दहा हजार शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र मध्यवर्ती जकात नाका परिसरात असलेली अपुरी जागा, शस्त्रक्रियागृह नसल्याने उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. दरम्यान या संस्थेचे ५० लाख रुपयांचे बिल झाले आहे. एका शस्त्रक्रियेसाठी महापालिकेने ९५० रुपयांचा दर दिला होता. 

लॉकडाऊनमुळे थांबले होते काम 
कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेची निविदा प्रक्रिया सुरू होती. मात्र लॉकडाऊनमुळे निविदा अंतिम करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला. आता हे काम राजस्थानमधील उषा एन्टरप्रायजेस अॅन्ड अॅनिमल सर्व्हिसेसचा देण्यात आले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

जुन्या निविदेची मुदत संपल्याने नव्या संस्थेला काम देण्यात आले. नव्या संस्थेने एका निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी ७५० रुपये एवढा दर भरला आहे. संस्थेचे कुत्रे पकडणारे कर्मचारी शहरात दाखल झाले आहेत. लवकरच डॉक्टरांची टीम येणार आहे. सध्या २० ते २५ कुत्र्यांवर रोज शस्त्रक्रिया सुरू आहे. 
बी. एस. नाईकवाडे, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog Sterilization Aurangabad Municipal Corporation