
जायकवाडी आणि सुखना या तलावांवर देशी, विदेशी पक्षांचे थंडीच्या दिवसात जणू संमेलनच भरलेले पाहायला मिळत. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे, मात्र जायकवाडी जलाशयावर पक्ष्यांचे आगमन मंदावले आहे.
औरंगाबाद : जायकवाडी आणि सुखना या तलावांवर देशी, विदेशी पक्षांचे थंडीच्या दिवसात जणू संमेलनच भरलेले पाहायला मिळत. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे, मात्र जायकवाडी जलाशयावर पक्ष्यांचे आगमन मंदावले आहे. काही पक्षी तर अद्याप आले नाहीत. हजारोंच्या संख्येत थव्याने येणारे रोहित पक्षी अजूनही पाहायला मिळत नाहीत तर बदके, करकोचे, कुराव पक्षी दुर्मीळ झाले आहेत. जायकवाडी जलाशयावर मोठ्या संख्येने पक्षी येतात. त्यांना खाण्यासाठी भरपूर खाद्य या ठिकाणी असल्याने जायकवाडी जलाशयाच्या पाणपसाऱ्याकडे पक्षी झेपावतात. थंडी सुरू झाली , जलाशयातील पाणी संथ झाले की पाणथळ तयार होते आणि मासे, खेकडे, झिंगे, शंख,शिंपले, पान कीटक, पाण वनस्पती, शेवाळे वाढल्याने ते खाण्यासाठी उत्तरेकडून,भारतातून,परदेशातून विविध पक्षी येतात.
तिकडे बर्फ पडल्याने अन्न तुटवडा झाल्याने हे पक्षी जायकवाडीकडे येतात. या ठिकाणी येणारे विविध प्रजातीच्या पक्षांमुळे जायकवाडी सरोवर पक्षी अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. जशी थंडी पडायला सुरुवात झाली की, सायबेरिया, रशिया, चीन, तिबेट, हिमालय मार्गे चार महिन्यासाठी पाहुणे पक्षी येत असतात, मात्र यंदा डिसेंबर सुरू झाला तरी पक्षी येण्याच्या काही हालचाली दिसत नाहीत. सोनेवाडी, दहेगाव, पिंपळगाव, रामडोह, कायगाव, एरंडगाव, ब्रह्महगव्हण, धरणाची भिंत या ठिकाणी वारकरी बदक, पाणकोंबडी, पान डुबी, पणभिंगरी हे पक्षी अजुनतरी पाहायला मिळत नसल्याचे पक्षिप्रेमींकडून सांगण्यात आले.
पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून स्थानिक आणि परदेशी पक्षी कमी झाले आहेत. वास्तविकपाहता पाणी वाढले तर पक्षी वाढले पाहिजेत मात्र दिवसेंदिवस पक्षी येण्याचे प्रमाण कमी होत आहे. तलावात होणारी अवैध मासेमारी, गाळपेरे याला कारणीभूत आहे. ठरावीक मर्यादेपर्यंत मासेमारी आणि गाळपेरे ठीक आहे मात्र अतिरेक नको. पक्षांनी बसायला, चरायला जागाच राहिली नाही.पाण्यावर जाळे आणि थर्माकोल दिसल्याने पक्षी खाली उतरत नाहीत. पाण्याच्या सभोवताली झाडे झुडुपे नसल्याने पक्ष्यांना निवारा राहिला नाही, गाळ पेऱ्यात पक्षी उतरले की शेतकरी हुसकावून लावतात.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी भलीमोठी योजना जायकवाडी इथे उभी केली आहे ,या बांधकामामुळे पक्ष्यांची हक्काची जागा हरवली आहे. स्थानिक पक्षांमध्ये मुग्धबळक, चमचा, शराटी, सुरय, कूरव, शेकाट्या, धनवर बदक, पान कावळे, राखी सारंग, रंगीत करकोचे हे कमी संख्येने आहेत. परदेशी पक्ष्यांमध्ये माळ भिंगरी, किरा, तुत्वार,पट्टेरी हंस, थापट्या बदक, मत्स्य गरुड, पयमोज गरुड, पानघार , पनलावा, पान टीवळा हे यंदा कमी संख्येने आले आहेत. तर क्रौंच पक्षी, तरंग बदक, चाक्रांग बदक, तलवार बदक, भुवई बदक हे दिसत नाहीत. पूर्वी पाण्यावर आणि काठावर पक्षीच पक्षी दिसायचे,आता शोधावे लागत असल्याचे डॉ. पाठक म्हणाले.
Edited - Ganesh Pitekar