भरवस्तीतील रोहित्राने घेतला पेट, जीवितहानी नाही

सुभाष होळकर
Monday, 26 October 2020

विजेचा भार जास्त वाढल्याने शिवना (ता.सिल्लोड) येथे गावातील मध्यवस्तीत महावितरण कंपनीच्या रोहित्राने अचानक पेट घेतला.

शिवना (जि.औरंगाबाद) : विजेचा भार जास्त वाढल्याने शिवना (ता.सिल्लोड) येथे गावातील मध्यवस्तीत महावितरण कंपनीच्या रोहित्राने अचानक पेट घेतला. सोमवारी (ता.२६) दुपारी एकला घडलेल्या या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. जमिनीलगत असल्यामुळे हे रोहित्र पावसाळ्यात पाण्यात बुडाले होते. गेली अनेक दिवस जास्त क्षमतेचे रोहित्र मिळावे व भरवस्तीतून या रोहित्राचे स्थलांतर व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी महावितरणकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.

पंकजा मुंडे, जानकर यांच्यावर गुन्हा दाखल; दसरा मेळाव्याला गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका

मात्र दखल घेतली गेली नाही. रोहिले गल्लीतील ९४०४०२३ व ९४०४०११ या क्रमांकांच्या या दोन रोहित्रावर विजेचा भार दुप्पटीने वाढला आहे. त्यामुळे भार वाढल्याने या रोहित्राने आज पेट घेतला. शेख कालुभाई, इरफान अतार, सोहेल खान, तारेक चाऊस आदींनी धोका पत्कारुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीत रोहित्र व आजुबाजुच्या घरांतील उपकरणे जळून खाक झाली आहेत.

अभियंत्याचे पदरिक्त!
बऱ्याच दिवसांपासून येथील सहायक अभियंता हे पदरिक्त आहे. येथील अभियंत्याची बदली झाल्यानंतर महावितरणने शिवना येथील पद हेतुपुरस्सर भरले नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DP Catch Fire In Crowded Area Of Shivana Aurangabad News