esakal | पंकजा मुंडे, जानकर यांच्यावर गुन्हा दाखल; दसरा मेळाव्याला गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका
sakal

बोलून बातमी शोधा

2pankaja_munde1_0

सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या दिवशी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे यांच्यासह इतर ५० जणांवर रविवारी (ता.२५) रात्री पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे, जानकर यांच्यावर गुन्हा दाखल; दसरा मेळाव्याला गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका

sakal_logo
By
सुधीर एकबोटे

पाटोदा (जि.बीड) : तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या दिवशी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे यांच्यासह इतर ५० जणांवर रविवारी (ता.२५) रात्री पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी मागील तीन वर्षांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या दसरा मेळावा घेतात.

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

प्रतिवर्षी या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने त्यांच्या समर्थकांची गर्दी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाइन होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार रविवारी पंकजा यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातूनच आपल्या समर्थकांना ऑनलाईन संबोधित केले. परंतु सावरगावात मेळावा नसूनही पंकजा येणार असल्याने शेकडो समर्थक त्याठिकाणी जमले होते.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत असे असताना देखील त्याठिकाणी गर्दी जमल्यामुळे अंमळनेर पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारीवरून पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे यांच्यासह इतर ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर