कोरोना उपचारासाठी आठशे खाटांची वाढ, रेमडेसीवीरचे तीन हजार आठ इंजेक्शन उपलब्ध

मधुकर कांबळे
Tuesday, 6 October 2020

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात कोरोनारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६९ टक्के झाले आहे.

औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६९ टक्के झाले आहे. उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना खाटा वाढवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात ८०० खाटांची वाढ झाल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सोमवारी (ता.पाच) आढावा बैठकीत दिली.

Corona Update : औरंगाबादेत १६४ कोरोना रुग्णांची भर, आतापर्यंत ९६९ जणांचा मृत्यू

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना आढावा बैठक झाली. बैठकीला खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, प्रदिप जैस्वाल, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. डॉ. गव्हाणे यांनी सांगीतले, कोरोना संसर्गाच्या प्रमाणात घट होत आहे तसेच प्रमाण कमी होत असून रुग्णालयात दाखल रुग्ण संख्याही कमी होत आहे. त्याच प्रमाणे मृत्यूदर कमी करण्यात यश येत आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून मृत्यूदर २.६९ टक्केपर्यंत आला आहे.

चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आरटीपीसीआर ९४,६७३ तर ॲण्टीजन चाचण्या २,६७,७६६ या प्रमाणे एकुण चाचण्या ३,६२,४३९ इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा १०८ ठिकाणी १३७१३ आयसोलेशन बेड तर २०३१ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच ५२६ आयसीयू बेड तर २३० व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, होम आयसोलेशनद्वारे १८७६ रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडीसीवीर इंजेक्शन कुठे उपलब्ध होईल यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मदत करावी, असे खासदार इम्तियाज जलील, आमदार बागडे, श्री. जैस्वाल, श्री सावे, श्री. दानवे, श्री. शिरसाठ यांच्यासह सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या.

रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी औरंगाबादेत वाघ्या-मुरळीने केला जागर

रेमडेसीवीरची उपलब्धता
घाटी आणि जिल्हा रुग्णालयात १,७२३ तर खासगी रुग्णालयात १,२८५ असे एकूण ३००८ इंजेक्शन उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. औषध निरीक्षक वर्षा महाजन यांच्याकडे ९७६७२७०३६८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून इंजेक्शन उपलब्धतेबाबत माहिती घेता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Hundred Cots Available For Corona Treatment Aurangabad News