
एसईबीसीबाबतच्या निर्णयामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. शासनाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
औरंगाबाद : एसईबीसीबाबतच्या निर्णयामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. शासनाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया थांबण्यापूर्वीच अकरावीचे ६० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. शनिवारी (ता.पाच) दुसऱ्या फेरीसाठीची यादी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीसाठी ५ हजार ४४ जगांवर ॲलॉटमेंट देण्यात आले असून, या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना ९ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करायची आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
यंदा कोरोनामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू झाली. नऊ सप्टेंबरपर्यंत पहिली प्रवेश फेरी पूर्ण होऊन दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर करण्यात येणार होती. सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याच्या अनुषंगाने पुढील निर्णयापर्यंत दुसऱ्या फेरीनंतरची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. २४ नोव्हेंबरला ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. अकरावी प्रवेशासाठी एकूण ११६ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३१ हजार ४६५ आहे.
पहिल्या फेरीत ८ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी ६१०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर कोटा प्रवेशात १७८२ जणांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीसाठी २८६० विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र ५ डिसेंबर रोजी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात ५ हजार ४४ विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट देण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. तर १० डिसेंबर रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठीच्या रिक्त जागांचा तपशील जाहिर करण्यात येणार आहे.
संपादन - गणेश पिटेकर