बालकांचे आरोग्य या कारणामुळे आले धोक्यात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

पीसीव्ही निमोनियाची लस उपलब्ध नाही. ही लस बाळाला न टोचल्यास त्याला भविष्यात संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात बालकांना करण्यात येणाऱ्या नियमित लसीकरणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात पीसीव्ही निमोनियाची लस उपलब्ध नाही. ही लस बाळाला न टोचल्यास त्याला भविष्यात संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय दवाखाण्यात ही लस उपलब्ध नसल्याने खासगी दवाखान्यातून हजारो रूपये मोजून लस टोचून घ्यावी लागत आहे. 

बाळाला काविळ, पोलिओ आणि क्षयरोग प्रतिबंधासाठी बीसीजी, हेपिटायटीज बी झिरो आणि पोलिओ डोस दिले जातात. सहा आठवड्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, काविळ, मेंदूज्वर, पोलिओ, अतिसार, न्युमोनियाचे लसीकरण व डोस दिले जातात. दहा, चौदा आठवड्यात यांच्या जोडीला मेंदूज्वराची लस दिली जाते. तर नवव्या महिन्यात गोवर व रूबेला, रातआंधळेपणा कमी करण्यासाठीच्या आणि न्युमोनियाच्या लसी दिल्या जातात. त्यानंतर नियोजित वेळेप्रमाणे वयाच्या १६ वर्षापर्यंत वेगवेगळे लसीकरण करावे लागते. मात्र, मार्चपासून कोरोनाचा लसीकरणावर मोठा परिणाम झाला आहे.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

एप्रिल - मे दरम्यान ४३ हजार ३२० प्रसुती झाल्याची नोंद आहे, यापैकी ४३ हजार १८७ जिवंत जन्म आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये लसीकरण कमी झाल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी मान्य केले तर जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी तथा प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांनी लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्याचे सांगीतले. 
कोरोनाबाधितांना श्‍वसनाचा त्रास होतो, न्युमोनियात हा त्रास होत असतो. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या धक्कदायक माहितीनुसार, जिल्ह्यात न्युमोनियाची लस मात्राच उपलब्ध नाही. राज्याकडे ही लस मिळण्यासाठी मागणी करण्यात आल्याचे प्रादेशीक आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

‘‘न्यूमोनियाची लस बाळाला अतिशय आवश्‍यक आहे. बाळाचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी पीसीव्ही लस देणे खूप गरजेचे आहे. कारण यात बालकांचा मृत्यूदर अधिक आहे. शासकीय दवाखाण्यात लस उपलब्ध नाही मात्र खासगी दवाखाण्यात उपलब्ध आहे. खर्चिक असली तरी ती बाळासाठी टोचून घेणे खूप आवश्‍यक आहे.’’ 
डॉ. मंजुषा शेरकर, बालरोगतज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Endangering the health of children