दुसऱ्याचे वाचले तरी मराठी साहित्याचे होईल भले !

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : अनुभवसंपन्न साहित्य हे एकाच वेळेस साहित्यही असतं आणि माणसाच्या जगण्याचा इतिहास असतो. हे जर आपण विचारात घेतलं तर कोरोनाच्या काळात साहित्य निर्मिती होणे आवश्यक आहे. मग ती कविता, कथा, कादंबरी अथवा अन्य प्रकारचे लेखन असो. साहित्यिकांनी घेतलेला वेध लेखनामध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, या माध्यमातून नव्या पिढीसमोर इतिहास येईल, अशा भावना ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर ते कथाही लिहीत असुन एकाने दुसऱ्याचे वाचले तरी मराठी साहित्याचे भले होईल, अशी तिरकस टिप्पनीही त्यांनी केली.

जगाला भयभीत केलेल्या कोरोनाकाळात प्राचार्य बोराडे काय करीत आहेत, साहित्य क्षेत्रात काय सुरू आहे, याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतले. ते म्हणाले, की विश्वव्यापी कोरोनावर साहित्यिकांनी लिहायलाच हवं. हे साहित्य लगेच प्रकाशित नाही झालं तरी चालेल. पण या काळातील वास्तव हे साहित्यातून समोर आलेच पाहिजे. आपण घराबाहेरही जाऊ शकत नाहीत; मात्र रोजगारासाठी दुरवरून आलेल्यांनी आपल्या घराकडे पायी जाणे, ही कल्पनाच सहन होत नाही.

थकलेल्या मजुरांचा रेल्वेखाली बळी जातो, हे सर्वकाही भयावह आहे. अशा वेळी त्यांच्या आई-वडिलांच्या, नातेवाइकांच्या मनाची तडफड मनाला चटका लावणारी आहे. एकजात माणूस उभा करायचा असेल तर चित्रकार, शिल्पकार, लेखक, कलावंत, प्रत्येक घटकाला प्रयत्न करावे लागणार आहे. आम्ही जिंकूच. शिवाय, उद्याचा जो नवसमाज आहे तोदेखील घडवू, अशी भूमिका घ्यावी. 

राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल 
तुम्हाला लढाई जिंकायची असेल तर घरात बसा, असे कधी घडलेलेच नाही; पण आता या कोरोनाला हरविण्यासाठी घरात बसावेच लागेल. यातही आता राजकारण येतंय. हा मानवतेचा विषय आहे. सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन न दिसणाऱ्या कोरोनाला हरवण्यासाठी लढावे. उद्या यातून बेरोजगारीचे प्रश्न उपस्थित होणार आहेत. नंतर चांगलं होईल, याची आताच शाश्वती देता येणार नाही. मी माझ्यापुरते, आपल्यापुरते बघेल, असे चालणार नाही. जात, धर्म, लिंग असा सर्व भेद सोडून मानव म्हणून एकमेकांना मदत करावी लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘करू नका थट्टा कोरोनाशी’

मी घरात आहे; पण विविध माध्यमातून कोरोनाची स्थिती समजून घेत आहे. माझे जे अवलोकन आहे ते मी लेखनाच्या माध्यमातून समोर ठेवणारच आहे. ‘करू नका थट्टा कोरोनाशी’ व अन्य एक अशा दोन कथा लिहीत आहे. कथेनेच मला ऊर्जा दिली. यावर कादंबरीच यायला हवी. ती लिहिण्याची ताकद मराठी साहित्यिकांनी दाखवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

दुसऱ्याचे वाचले तरी मराठी साहित्याचे होईल भले

महाराष्टातील प्रत्येक घरात एक जरी पुस्तक वाचल्या गेले, तरी मराठी साहित्याचे भले होईल, असे एकाने सोशल मिडीयावर म्हटले होते. त्यावर मी, म्हटले मराठी साहित्यातील साहित्यिकांनी दुसऱ्याचे वाचायचे ठरवलं तरी मराठी साहित्याचे भले होईल. वाचक चळवळ रुजवणे हे कालबाह्य होत आहे. मी, नातवाच्या वयाच्या लेखकांची पुस्तके विकत घेऊन वाचतो. कारण सुरवात आपण करायला हवी. प्रकाशनाचा व्यवसाय देखील चाललाच पाहीजे ना, मग हे करावेच लागेल.

...म्हणुन मी लिहतो.

बऱ्याच नवलेखकाला पुस्तक प्रकाशनाची, पारितोषीक मिळाले पाहीजे, याची घाई आहे. यापेक्षा साहित्याचा वाचकवर्ग निर्माण करायला हवा. मी, 60 वर्षापासुन लिहीत आलो. वाचक वाचतात म्हणुन मी आजही लेखन सुरुच ठेवलेले आहे. याचा मला अभिमानही आहे, असेही प्राचार्य बोराडे नमुद करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com