औरंगाबाद : दुकाने फोडून साहित्य लंपास, पोलिसांकडे तक्रार केल्याने मारहाण

मनोज साखरे
Saturday, 29 August 2020

बाळापूर रस्त्यावरील फॅब्रिकेशन व किराणा दुकान फोडून चोरट्यांनी माल लंपास केल्याची घटना ता.२७ ऑगस्टला मध्यरात्री घडली. भारत अंबादास साळुंके (३०, रा. भगवान बाबानगर, बाळापूर रोड) यांचे बाळापूर रस्त्यावर फॅब्रिकेशनचे दुकान असून शेजारी गणेश पवार यांचे आदित्य किराणा भुसार मालाचे दुकान आहे.

औरंगाबाद : बाळापूर रस्त्यावरील फॅब्रिकेशन व किराणा दुकान फोडून चोरट्यांनी माल लंपास केल्याची घटना ता.२७ ऑगस्टला मध्यरात्री घडली. भारत अंबादास साळुंके (३०, रा. भगवान बाबानगर, बाळापूर रोड) यांचे बाळापूर रस्त्यावर फॅब्रिकेशनचे दुकान असून शेजारी गणेश पवार यांचे आदित्य किराणा भुसार मालाचे दुकान आहे. चोरट्यांनी शटर उचकटून किराणा दुकानातील माल व फॅब्रिकेशन दुकानातील वेल्डिंग, ड्रिल मशीन, एअर ब्लोर, स्पॅनर सेट असा असा एकूण २० हजार चारशे रुपयांचा ऐवज लंपास केला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

पोलिसात तक्रार केल्यावरून मारहाण
पोलिसांत तक्रार केल्यावरून दोघांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना २७ ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास बेगमपुरा पोलिस ठाण्यासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू रामाजी गायकवाड (वय ३५, रा. संजीवनी अपार्टमेंटसमोर, बेगमपुरा) यांना, पोलिसात आमच्याविरुद्ध तक्रार कशी काय करतो असे म्हणत भरत जगताप व कैलास जगताप (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) यांनी मारहाण केली. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

वाचा - महिला सरपंचासह ग्रामसेवकाला अटक, विकासकामे न करता ३१ लाखांचा अपहार

जुगार खेळणारे चौघे ताब्यात
बेगमपुरा पोलिसांनी घाटी क्वाॅर्टरमधील एका इमारतीसमोरील खुल्या रंगमंचाच्या मोकळ्या जागेत ता.२८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेसहाच्या सुमारास कारवाई केली. त्यात झन्ना-मन्ना जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले. शहाबाज ऊर्फ शिवू हारुण शेख, रितेश राजवीर परौचा, लखन मदनलाल चरण व मोहन गंगाधर शेलार अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख १७ हजार ३७० रुपये जप्त करण्यात आले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली.

हेही वाचा - सगळ्यात भारी कोथिंबीरी, शेतकऱ्यांना मिळून देई लाखो रुपयांचे उत्पन्न

पार्किंगमधून दुचाकी लंपास
हॅंडल लॉक तोडून अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी लंपास केल्याचा प्रकार २६ ऑगस्टला मध्यरात्री खिंवसरा पार्क भागातील उद्योगराज अपार्टमेंटमध्ये घडला. नरेंद्र नारायणराव कुलकर्णी (५४) यांची ही दुचाकी होती. जवाहरनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fabrication, Grocery Shop Broken Aurangabad News