औरंगाबादेत व्हाटस् अपवर शेतकरी विकताहेत रोज दीड लाखांचा भाजीपाला, फळे

सुषेन जाधव
Wednesday, 1 April 2020

कोरोना व्हायरसमुळे आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून पायाला चाके लावून धावणारे शहर थांबले खरे; परंतु भाजीपाल्यापासूनच अडचणींना सुरवात झाली. दुसरीकडे शेतकऱ्यांचाही शेतमाल, भाजीपाला, फळे व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करून शहरात चढ्या भावाने विक्री करू लागले, यावर कृषी विभागाने ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून तोडगा काढला. 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसमुळे आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून पायाला चाके लावून धावणारे शहर थांबले खरे; परंतु भाजीपाल्यापासूनच अडचणींना सुरवात झाली. दुसरीकडे शेतकऱ्यांचाही शेतमाल, भाजीपाला, फळे व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करून शहरात चढ्या भावाने विक्री करू लागले, यावर कृषी विभागाने ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून तोडगा काढला. हाच मार्ग आता लाखो रुपयांची उलाढाल करत आहे, तर ग्राहकांनाही नाममात्र भावात अगदी ताजा भाजीपाला मिळत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

२२ मार्चचा जनता कर्फ्यू जाहीर झाला अन् तारांबळ उडाली ती भाजीपाला खरेदीसाठी. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले अन् ही तारांबळ, धावपळ वाढतच गेली, तर शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. यावर तोडगा काढत कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह जिल्हा पुरवठा विभाग, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शहरात जिल्हाभरातील २८ शेतकरी उत्पादक गटांनी लाखो रुपयांचा भाजीपाला हातोहात विक्री केला आहे. शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला या उपक्रमाद्वारे व्यापारी, दलालाची मध्यस्थी नसल्याने शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळत आहेत तर ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळत असल्याने तिथे घासाघीस होताना दिसत नाही. 

दिवसाकाठी विक्री दीड लाखांची 

जिल्हाभरातील पैठण, कन्नड व सोयगाव तालुके वगळता सर्वच तालुक्यांतील शेतकरी उत्पादक गटांनी एकत्र येत भाजीपाल्याच्या उपलब्धतेविषयी माहिती दिल्यानंतर शहरात भाजीपाला, फळे विक्रीसाठी आणली गेली. सोमवारी (ता.३०) या एकाच दिवसात सहा तालुक्यांतून एक लाख ४५ हजार ७०० रुपयांचा भाजीपाला, फळे शहरात विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मोटे यांनी दिली. यामध्ये एकट्या औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी ४६ हजार रुपयांचा ७५० किलो भाजीपाला आणि ७०० किलो फळे विक्री केली. एकाच दिवसात २५१० किलो भाजीपाला तर ४९५१ किलो फळे विक्री झाल्याचेही डॉ. मोटे म्हणाले. दरम्यान, मंगळवारी सोयगाव तालुका वगळता एक लाख ५७ हजार ९७० रुपयांची उलाढाल झाली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

भाजीपाला मागणीची ‘हायटेक’ पद्धत 
‘सकाळ’ने ‘भाजीपाला येणार दारात’ या मथळ्याखाली वृत प्रकाशित करून भाजीपाला, फळांच्या मागणीविषयी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे वृत्तपत्र बंद असतानाही ‘सकाळ’च्या वाचकांनी डिजिटल वृत्तपत्र वाचत भाजीपाल्याची मागणी नोंदवली. दरम्यान, डॉ. मोटे यांच्या संकल्पनेतून एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळांच्या उपलब्धतेविषयी माहिती ग्रुपवर पोस्ट केली. त्याच ग्रुपमध्ये असणाऱ्या मोठमोठ्या सोसायट्या, अपार्टमेंटमधील नागरिकांनी मागण्या नोंदविल्या. यात समन्वय होऊन हा दैनंदिन भाजीपाला विक्री होत आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

यावर करा संपर्क 
अनिलकुमार हदगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी औरंगाबाद मो. ९४२१३१६०९३, विश्वास जाधव, मंडळ कृषी अधिकारी, ९८३४६३९०८९/९४२२९०५१९२, रंगनाथ पिसाळ, कृषी सहायक ८२०८६६५३४४/९४०४६८०५०८ यांच्याशी संपर्क करता येणार आहे. 

अपार्टमेंट, सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिवांशी समन्वय करून त्यांना मागणीनुसार शेतकरी पॅकेट तयार ठेवतात, तसेच तिथे जाऊन नागरिकांच्या हवाली करतात. त्यामुळे गर्दी होत नाही सोशल डिस्टन्स पाळता येते. यातून शेतकरी, ग्राहक यांचा फायदा होत आहे. 
- डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Sell Every Day One And Half Lacks Vegetables, Fruits Through Whatsapp Group Aurangabad News