
औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या कामांचा वेग वाढला आहे. ग्रामीण भागात ९० टक्के नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ३३ हजाराहुन अधिक नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली. जिल्ह्यात सरकारी व खासगी रूग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती नोंदविण्याचे काम सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व लहान- मोठे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्ड बॉय, दवाखान्यात काम करणारे असे सर्व कर्मचारी व अंगणवाडी सविका, आशा वर्कर यांना लस देण्यात येणार आहे. नाव नोंदणीचे काम आपल्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे.
दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे लसीकरणाच्या कामांची तयारी करण्यात येत आहे. यात तालुका व गावपातळीवर दर आठवड्याला आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान नोंदणी केलेल्यानाच लस देण्यात येणार असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांची उपस्थिती होती.
लसीणकरणासाठी चारशेपेक्षा जास्त केंद्रे
लसीकरणासाठी जिल्ह्यात जवळपास चारशेहून अधिक लसीकरण केंद्र लागणार आहेत. यात एका आरोग्य केंद्रात तीन खोल्या आरक्षित करण्यात येतील. यात पहिल्या खोलीत व्यक्तीची प्राथमिक तपासणी करून त्या व्यक्तीला दुसऱ्या खोलीत लस टोचवण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. लस टोचल्यानंतर तिसऱ्या खोलीत त्या व्यक्तीला एका डॉक्टरच्या निगराणीखाली अर्धा तास राहावे लागणार आहे. यासाठी एका केंद्रावर पोलिस, डॉक्टर, नर्स असे सहा डॉक्टर- कर्मचारी काम पाहणार आहेत. एका केंद्रावर एक वेळा केवळ शंभर व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.
Edited - Ganesh Pitekar